आरोग्य : पावसाळा सुरू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जीवाची काहीली करणाऱ्या उष्णतेपासून सुटका झाली आहे. पण अर्थातच येणारा पावसाळा सोबत अनेक आजारपण देखील घेऊन येत असतो. तर मग काही अशा सवयी आणि घरातील साधे सोपे उपाय आहेत. ज्यामुळे आपण आपल्या घरच्यांपासून आजारपण दूर ठेवू शकतो.
हे उपाय सांगण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. निसर्गापासून मुलांना अनभिज्ञ राहू देऊ नका. अर्थात पावसात भिजू नको, पावसात घराच्या बाहेर पडू नकोस वगैरे गोष्टींनी त्यांना घाबरू नका. खरंतर पहिल्या पावसामध्ये मुलांना भिजवायलाच हवं ! ज्यामुळे उष्णता, घामोळ्या, कांजण्यामुळे आलेले फोड यांवर आराम मिळत असतो. तर मग अति काळजी न करता पावसाळा देखील एन्जॉय करा. या साध्या सोप्या उपायांसोबत…
सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यात कपडे वाळत नाहीत ही सर्वात मोठी समस्या असते. त्यामुळे कपडे फार धुवायला टाकूच नका. जे कपडे भिजले जात आहेत तेवढेच कपडे धुवा. अर्थात जेवढी तुमच्याकडे कपडे सुकवण्यासाठी जागा आहे त्याचा अंदाज घेऊनच कपडे धुवा. अंगावर ओलसर कपडे घातल्याने स्किन इन्फेक्शनसह सर्दी पडसे लवकर होण्याची शक्यता असते, त्यामुळेच ही काळजी घेणं आवश्यक आहे.
- पावसात जर तुम्ही भिजून आले असाल तर अंघोळ करायला विसरू नका. बाहेरून आल्यानंतर हात स्वच्छ धुणे ही सवय देखील स्वतःला लावूनच घ्या.
- मुलांना शाळेत पाठवताना किंवा बाहेर खेळायला पाठवताना त्यांना ओडोमास लावायला विसरू नका. पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव देखील वाढत असतो आणि अर्थातच डासांमुळे देखील मोठे आजार पसरत असतात. त्यामुळे ही छोटीशी एक काळजी घ्या.
- या दिवसांमध्ये पाणी उकळून पिऊ शकले तर उत्तम !
- घरामध्ये सकाळ संध्याकाळ कापूर जाळायला विसरू नका. यामुळे घरातील निर्जंतुकीकरण होते.
- पावसाळ्यात अन्न हमखास गरम करूनच खावे. सकाळ संध्याकाळ ताजे अन्न घेतल्यास उत्तम.
- विशेष करून पावसाळ्याच्या दिवसात स्ट्रीट फूड खाणे टाळा.
- पावसाळ्यामध्ये आजूबाजूचे वातावरण हे ओलसर असते. अशामध्ये जर तुम्ही कचरा घरामध्ये किंवा अगदी घराजवळ जरी ठेवलाय तर तो घरापासून होईल तेवढा लांब नेऊन नष्ट करा. शहरी भागांमध्ये कचरा नेण्यासाठी योग्य उपाययोजना केलेली असतेच, पण या दिवसात कचरा साठणार नाही याची विशेष काळजी घ्या. त्यामुळे घरामध्ये माशा, चिलटे येणार नाहीत. ज्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता कमी होते.
- अशा वातावरणात घरामध्ये कीटक, झुरळे यांच्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे घर स्वच्छ आणि जमेल तेवढे कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा.