Krantisingh Nana Patil : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नाव म्हणून क्रांतीसिंह नाना पाटील यांची ओळख आहे. ब्रिटिश सरकारला नामोहरम करून सोडणारा क्रांतिकारक ते ब्रिटिश सत्तेच्या विरोधात प्रतिसरकार स्थापन करणारे बंडखोर नेते म्हणून इतिहासात त्यांची नोंद आहे. सातारा आणि सांगली भागात स्वातंत्र्यलढ्याची चळवळ मजबुतीने चालवणारे नेते ते मराठवाड्यातील बीड मधून खासदार म्हणून निवडून येण्याची किमया करणाऱ्या क्रांतीसिंह नाना पाटलांची ३ ऑगस्ट रोजी जयंती असते. त्यानिमित्ताने नाना पाटील या व्यक्तिमत्वाचा प्रवास उलगडणारा महाटॉक्सचा हा खास लेख.
कोण होते क्रांतीसिंह नाना पाटील?(Krantisingh Nana Patil)
३ ऑगस्ट १९०० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र या गावी नाना पाटील यांचा जन्म झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरीही केली. भरदार शरीरयष्टी आणि भारदस्त व्यक्तिमत्व यामुळे लोक नानांकडे आकर्षित होत असत.
नाना पाटीलांचे प्रारंभीचे जीवन
१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीच्या कार्यात नाना पाटलांनी स्वतःला वाहून दिले. चळवळीसाठी नाना पाटलांनी आपल्या तालाठी पदाच्या नोकरीचाही त्याग केला. त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राला गुलामगिरीच्या जाचातून मुक्त करण्यासाठी लोकांना गुलामगिरीची जाणीव करून दिली. त्याबरोबरच जनतेला धाडसी बनवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहिले. प्रभावी भाषणे, लोकांना आपलेसे करण्याची कला, देशाप्रती निस्सीम श्रद्धा आणि लोकांमध्ये प्रबोधन करण्याची हातोटी नानांमध्ये होती.
नाना पाटील आणि स्वातंत्र्यलढा
ब्रिटिश सरकारच्या जाचाला जनता कंटाळली होती. बंडखोर स्वभावाच्या नाना पाटील यांच्या मनात देखील ब्रिटिश सत्तेविरुद्ध प्रचंड रोष होता. ब्रिटिश शासनाला समांतर अशी यंत्रणा उभी केली पाहिजे, असा विचार नाना पाटलांच्या मनात आला. परिणामी त्यांनी १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीच्या वेळी प्रतिसरकार प्रत्यक्षात आणले.
नाना पाटील यांचे प्रतिसरकार
नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातल्या एका दलाचे (तुफान दल) फील्ड मार्शल जी.डी. लाड (बापू) आणि कॅप्टन आकाराम (दादा) पवार होते. या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करत होत्या. तलवारी सारख्या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल, बॉंबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारचे प्रतीसरकार अशी ओळख तयार झाली.
प्रतिसरकारचे कार्य
या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजार व्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोक न्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणाऱ्या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.
नाना पाटील यांचे स्वातंत्र्यत्तर काळातील जीवन
देश स्वातंत्र्य झाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी स्वतःला वाहून घेतले. पुढे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षांच्या माध्यमातून ते कार्य करत होते.
१९५७ रोजी उत्तर सातारा लोकसभा मतदारसंघातुन तर १९६७ साली बीड लोकसभेवर ते निवडून गेले. लोकसभेमध्ये मराठीतून भाषण करून महाराष्ट्राचा आवाज नाना पाटीलांनी बुलंद केला.
क्रांतीसिंह ही पदवी नानांना कोणी दिली?
२६ मे १९६६ साली मुंबईच्या शिवाजी पार्कवर भरगच्च सभेत आचार्य अत्रेंनी त्यांना क्रांतीसिंह ही पदवी बहाल केली.
क्रांतीसिंहांचा अखेरचा काळ
६ डिसेंबर १९७६ साली सांगली जिल्ह्यातील वाळवा या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार वाळवा येथे त्यांचा अंत्यविधी पार पडला.
तुम्ही हे देखील वाचू शकता,
पुण्यात ‘या’ ठिकाणी असणार टेस्लाचं पहिलं वहिलं कार्यालय, वाचा सविस्तर