पुणे : पुण्याच्या कात्रज उद्यानातून बिबट्याने पिंजऱ्यातून पळ काढण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या बिबट्याने सुरक्षा कड्याचे बार वाकवून बाहेर पळ काढला आहे असं म्हटलं जातंय.
बिबट्याने पळ काढल्याचे जेव्हापासून उघडकीस आले आहे तेव्हापासून अनेक चर्चांना उधाण आले आहे. नेमका बिबट्या केव्हा पळाला हे समजू शकत नाहीये. तर आत्ताच मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पहाटेच्या सुमारास बिबट्या उद्यानातच फिरत असतानाच स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे आता उद्यानाच्या 167 एकर परिसरामध्ये या बिबट्याचा शोध घेणे सुरू असल्याचं समजत आहे.
राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचा एकूण आवाका सुमारे 167 एकर मध्ये पसरलेला आहे. यातील दोन एकर भागामध्ये बिबट्या, वाघ अशा प्राण्यांच्या रहिवासाची व्यवस्था केली गेलेली आहे. हा बिबट्या नेमका कसा आणि केव्हा पळाला हे अद्याप देखील स्पष्टपणे समजू शकलो नाही. परंतु सध्या उद्यानाची रेस्क्यू टीम आणि पुणे अग्निशमन दल या बिबट्याचा कसून शोध घेत आहेत. या संग्रालयात ४०० हुन अधीन विविध प्राणी आहेत.
हा बिबट्या आठ वर्षाचा असून त्याचं नाव सचिन आहे. पूर्णपणे शरीराने विकसित झालेल्या या बिबट्यामुळे इतर प्राण्यांना देखील धोका असल्याचं नाकारता येत नाही. त्यामुळे या बिबट्याला आता संग्रहालयाच्या हद्दीत असतानाच लवकरात लवकर पकडलं जाणं आवश्यक आहे.
भिम शक्ती संघटनेचि कारवाईची मागणी
मागील काही दिवसापूर्वी दोन हरणांचा कुत्र्यांनी बळी घेतला होता .तसेच चंदनाची झाडे चोर गेली होती अशा अनेक प्रकारच्या घटना घडत गेल्या आहेत. ह्या संपूर्ण गोष्टीची दखल पुणे महानगरपालिका प्रशासन व्यवस्थापक वनविभाग घेत नाही. या घटनेच्या निषेधार्थ भिम शक्ती संघटना पुणे शहर महाराष्ट्र राज्यच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. घडल्या प्रकरणावर योग्यरीत्या कारवाई करण्यात यावी अशी मागणी भिम शक्ती संघटना पुणे शहर सचिव युवक पश्चिम महाराष्ट्र विजय रामचंद्र हिंगे यांनी केली आहे.