महाराष्ट्र : पापलेट राज्यमासा घोषित करण्यात आला आहे. त्यानंतर आता 54 माशांचे आकारमान निश्चित करून त्यांची खरेदी, विक्री आणि मासा पकडण्यावर देखील राज्य सरकारनं आता निर्बंध घातले आहेत. सध्या माशांच्या साठ्यात कमतरता येत असलेल्याचं दिसून येत आहे. काही मासे हे लुप्त होण्याकडे वाटचाल करत आहेत. त्यामुळे संवर्धनाच्या दृष्टीनं शासनाचा निर्णय महत्त्वाचा मानला जातो.
दरम्यान, बाजारात गेल्यानंतर किंवा हॉटेलमध्ये थाळीची ऑर्डर दिल्यानंतर माशांच्या आकाराकडे प्रत्येकाचं लक्ष असते. अर्थात दर देखील याच आकारमानावरून ठरतात. या माशांचं आकारमान निश्चित करून त्यांच्या पकडण्यापासून ते खरेदी विक्रीपर्यंत राज्य सरकारनं आता काही निर्बंध आणले आहेत. यामध्ये 54 माशांचा समावेश आहे. त्यामुळे सुरमई असो किंवा बांगडा, सौदळा असो किंवा पापलेट यासह इतरही 54 माशांचं आकारमान निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळे निश्चित केलेल्या आकरामानापेक्षा आकारानं लहान असलेला मासा पकडता येणार नाही. शिवाय, त्याची खरेदी विक्री देखील करता येणार नाही.
आकारमान निश्चित केलेल्या माशांमध्ये सुरमई 370 मिमी, बांगडा 140 मिमी, सरंगा 170 मिमी, तारली 100 मिमी, सिल्वर पापलेट 135 मिमी, चायनीज पापलेट 140 मिमी, भारतीय म्हाकूळ 100 मिमी, झिंगा कोळंबी 90 मिमी, मांदेली 115 मिमी, मुंबई बोंबील 180 मिमी यासह इतर प्रजाती मिळून 54 प्रजातींसाठी हे आकारमान अशाप्रकारे निश्चित केलेलं आहे.