मुंबई : मुंबईकरांवर गेल्या अनेक दिवसांपासून संक्रांत येतेच आहे. तांत्रिक बिघाड, दुरुस्ती, अपघात अशा कारणामुळे रेल्वेला विलंब होणे किंवा मेगाब्लॉक लागणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. अशातच आता आज पुन्हा एकदा पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वाहतूक 25 ते 30 मिनिट उशिराने सुरू आहे.
आज आठवड्याचा पहिला दिवस आहे. मुंबईची गती आज पुन्हा वाढण्याच्या ऐवजी मात्र रेल्वेच्या वाहतूक विस्कळीत झाल्याने मंदावली आहे. बोरिवली, कांदिवली ,मालाड, वसई, नालासोपारा आणि विरार स्थानकावर सध्या प्रचंड गर्दी झाली आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सर्वच रेल्वे 25 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर बोरिवली स्थानकातील हा तांत्रिक बिघाड असल्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन वरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर संपूर्ण ताण आला असल्याने धीम्या लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक तीन चार पाच सहा सात आणि आठ वरून धावत आहेत.