महाराष्ट्र : उच्च व तंत्र शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. नक्षलवादी, दहशतवादी, दरोडेखोरांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या किंवा कायमस्वरूपी जायबंदी झालेल्या उच्च शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर प्राधान्याने शासन सेवेत नियुक्ती देण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे.
राज्य शासकीय सेवेत कार्यरत असताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर शासन सेवेत सामावून घेण्याचे धोरण आहे. गट क व गट ड संवर्गातील सरळसेवा कोटयातील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या 20 टक्के पदे अनुकंपा तत्त्वावर भरण्यात यावीत असे सर्वसाधारण धोरण आहे.
अनुकंपा नियुक्त्यांचे हे सर्वसाधारण धोरण उच्च शिक्षणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू आहेच, त्याचबरोबर आता अकृषी विद्यापीठे, शासकीय, खासगी अनुदानित महाविद्यालये, तंत्र शिक्षण संचालनालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ-लोणेरे, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, लक्ष्मीनारायण अभिनव विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, तसेच अनुदानित अभिमत विद्यापीठे यांमधील शासनमान्य गट अ ते गट ड या पदांसाठी स्वतंत्र अनुकंपा धोरण जाहीर केले आहे.