नवी दिल्ली : रविवार दिनांक 9 जून रोजी सायंकाळी सात वाजता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपला तोंडावर आपटल्यासारखे अपयश सहन करावे लागले आहे. यानंतर उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी थेट पदमुक्त करावे अशी मागणी केली होती. यावर त्यांनी आता दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shah यांची भेट घेतली आहे.
राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये दोन वेळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील एकंदरीत अपयशाबाबत आणि त्यांच्या मागणीबाबत चर्चा केली आहे. यावर गृहमंत्री अमित शहा देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले आहेत की, ” सध्या तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर पण महाराष्ट्र बाबत सविस्तर चर्चा करून निर्णय करू. महाराष्ट्रात काय करेक्टिव्ह उपाययोजना केल्या पाहिजेत याचा आराखडा तयार करू. पण तोवर तुम्ही आपलं काम सुरू ठेवा. ” असा सल्ला अमित शहा यांनी दिला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल आहे.
अमित शहा यांच्याबाबत झालेल्या या चर्चेनंतर आमदार आणि भाजपच्या पदाधिकारी यांच्याशी बैठकीत बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत राजकीय गणितात आपण कमी पडलो. मी मोकळं करा, हे निराशेतून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही. लढणारा व्यक्ती आहे. चारही बाजूंनी घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि पुन्हा ताकदीने सर्व किल्ले जिंकणारे शिवराय आमची प्रेरणा आहेत. कोणाला वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो, तर ते सत्य नाही. माझ्या डोक्यात स्टॅटेजी होती. मी अमित शाह यांना भेटून आलो, त्यांना काय डोक्यात आहे ते सांगितलं. त्यांनी मला सांगितलं आपण महाराष्ट्राची ब्लू प्रिंट तयार करु. मी एक मिनीट देखील शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाहीये”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.