महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election 2024 मतदान प्रक्रिया पार पडल्या आणि प्रतीक्षा होती ती निकालाची. पुढच्या काही तासातच आता लोकसभा निवडणुकीचे निकाल Lok Sabha Election Results घोषित होणार आहेत. त्यामुळे सर्वच मतदारसंघातील उमेदवारांची धडधड वाढली आहे.
या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतर आणि फोडाफोडी-जोडाजोडी असं राजकारण मोठ्या प्रमाणावर झालं. यामध्ये काही प्रमाणात मतदार राजा देखील नाराज झाला होता. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपाचा तिढा देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला. अखेर आता या सर्वातून महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण पुढे सरकलं असून मतदात्यांन सर्वांच नशीब आता त्या ईव्हीएममध्ये बंद केल आहे. उद्या आता अखेर कोण खासदार होणार हे निश्चित होणार आहे.
महाराष्ट्रामध्ये यंदा काही निवडणुका या प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. या निवडणुका आणि उमेदवार नेमके कोण हे आपण पाहूयात…
बारामती
अवघ्या देशाचं लक्ष उद्या असणार असा महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती.. बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भाऊजाई अशी लढत झाली आहे. यामध्ये महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये लढत झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता या हाय व्होल्टेज लढतीकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
बीड
बीडमधून देखील यावर्षीची लोकसभा निवडणूक ही महायुतीच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी तगड आव्हान उभे केले आहे.
सातत्याने भाजप पंकजा मुंडे यांना डावलते आहे का असा सवाल महाराष्ट्र करत होता. यावेळी लोकसभेसाठी पंकजाताई मुंडे या लढतीमध्ये मैदानात उतरल्या. यादेखील निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.
नाशिक
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवारासाठीचा तिढा सुटता सुटत नव्हता. अखेर महायुतीच्या वतीने हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध राजाभाऊ वाजे यांनी निवडणूक लढवली आहे. नाशिकमधून छगन भुजबळ हे देखील या उमेदवारीसाठी प्रचंड आग्रही होते. त्यामुळे आता नाशिकमध्ये नेमकं काय घडतं याकडे देखील महाराष्ट्राचे लक्ष लागल आहे.
सातारा
साताऱ्यामध्ये लढाई अर्थातच प्रतिष्ठेची आहे. उदयनराजे भोसले यांना देखील भाजपने सुरुवातीला उमेदवारी देताना काचकूच केलेली दिसून आल आहे. त्यात साताऱ्यातून काँग्रेसमध्ये देखील राजकीय हालचाली सुरळीत सुरू नव्हत्याच, त्यामुळे साताऱ्यातही फुटाफुटीच राजकारण मोठं झालं. उदयनराजे भोसले यांना शशिकांत शिंदे यांनी आव्हान दिल असून या लढाईमध्ये पारडं उद्या कोणाच जड आहे हे स्पष्ट होणार आहे.
पुणे
पुण्यामध्ये महायुतीचे भाजप पुरस्कृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये प्रमुख लढत होती. या हाय व्होल्टेज लढतीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वसंत मोरे यांनी देखील उडी घेतली. आणि पुण्यामध्ये आता कोण गुलाल उधळणार याबाबत निश्चित सांगणे कठीण आहे.
महाराष्ट्रातील अनेक लढती यावेळी केवळ राजकीय नाही तर कौटुंबिक देखील आहेत. पुढच्या काही तासातच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.