महाराष्ट्र : शाळा म्हटलं की लवकर उठायचं, युनिफॉर्म घालायचा, डबा घ्यायचा, दप्तर घ्यायचं आणि शाळेत निघायचं ! मित्र मैत्रिणी शाळेत भेटणार हा आनंद असला तरीही लवकर उठून शाळेत जाणे यामुळे मुलांच्या आरोग्यावर देखील घातक परिणाम दिसू लागले आहेत. बदलत्या जीवनशैलीनुसार प्रदूषण आणि अनारोग्य यामुळे लहान मुलांवर मानसिक आणि शाररिक विपरीत परिणाम होत आहेत. काही दिवसांपूर्वी अवघ्या दोन वर्षाच्या बाळाला हार्ट अटॅक आला. दहा वर्ष, तेरा वर्ष, अठरा वर्ष… अशा कोवळ्या वयातील मुलांना हार्ट अटॅक आणि वयाच्या उतरत्या काळात होणारे आजार होऊ लागल्याने पालक तर चिंतेत होतेच परंतु आता राज्य शासनाने देखील मुलांच्या चांगल्या आरोग्य आणि भवितव्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा असे राज्यपाल रमेश बैस यांनी सुचविले होते. अशातच येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतर सुरू करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.
तसेच हा निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असे केसरकर यांनी सांगितले आहे.