पुणे : पुण्यातील उरळीकांचन परिसरामध्ये बुधवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक यासाठी की 20 ते 25 मुलांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली आहे. यामध्ये ही मुलं अल्पवयीन आहेत हे एक विशेष आणि त्यासह या मुलांना मारहाण करताना पाहणारे नागरिक केवळ या मुलांचे व्हिडिओ काढण्यात दंग होते. बघ्यांनी कोणीही पोलिसांना फोन करणे किंवा या मुलांना थांबवणे असा कोणताही प्रकार केला नाही. त्यामुळे एकीकडे गुन्हेगारीचं कमी होणारं वय, त्यात भर रस्त्यात दांडगा करण्यासाठी येणारी हिम्मत आणि बघ्याची भूमिका घेणारे नागरिक हे केव्हाही मोठा गुन्हा घडण्यासाठी प्रमुख कारण ठरू शकतात.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, उरळी कांचन मधील स्वामी विवेकानंद अकॅडमी शाळेच्या गेट समोर बुधवारी रात्री अल्पवयीन मुलांच्या दोन टोक्यांमध्ये काही अज्ञात कारणामुळे वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये सुरू झाले. आणि पाहता पाहता या वीस ते पंचवीस जणांच्या टोळक्यामध्ये लाकडी दांडके, बॅट यांसह हाणामारी सुरू झाली. या घटनेमध्ये काही अल्पवयीन मुलं जखमी झाले आहेत. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटना ठिकाणी धाव घेतली. पोलीस पोहोचण्याच्या आत या मुलांनी त्या ठिकाणावरून धूम ठोकली होती. परंतु या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.