मानसिक आरोग्य : नात्यांमध्ये अनेक वेळा कटूता आल्याचं तुम्ही अनुभव असेल. आज आपण विशेष करून पती-पत्नीच नातं यावर चर्चा करूयात…
पती-पत्नीच्या नात्यांमध्ये अनेक वेळा विनाकारण कटूता येते. घरामध्ये अचानक निर्माण होणारे वाद, अबोला, चिडचिड ही आहेत त्याची लक्षणे… तर मग असं जर तुम्हाला वाटत असेल तर काही उपाय आज सांगते आहे ते नक्की करून पहा.
पती-पत्नीचं नातं हे आतून जेवढं गोड असतं तेवढंच बाहेरून त्याला काटे असतात. आता हे वाक्य जरा समजणं कठीण असलं तरी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर दोन माणसं एकत्र येतात तेव्हा त्यांच्या बरोबरीने दोन कुटुंब आणि त्या कुटुंबातील सर्व संकट देखील एक होतात. दोन वेगवेगळ्या वातावरणात वाढलेली जडणघडण झालेली ही माणसं कधी कधी पती-पत्नीच्या नात्याला फुलू देत नाहीत किंवा अनेक घरांमध्ये पती-पत्नीचे नातं फुलवण्यासाठी कुटुंबच सर्वात अधिक मदत करतात असे देखील आहे. बऱ्याच वेळा असं होतं की सगळ्या गोष्टी सुरळीत आणि आनंदात चालू असल्या तरी अचानक दोघांमध्ये खटके उडायला लागतात. भांडण, चिडचिड, हेवे-दावे सुरू होतात. मग अशावेळी हे उपाय नक्की करून पहा.
दुरावा
दुरावा हे नात्यांमध्ये ओढ निर्माण करणारे सर्वात जालीम औषध आहे. काही दिवसांसाठी एकमेकांपासून ब्रेक घ्या, आठ दिवस आपल्या नातेवाईकांकडे जा, किंवा एकटच एखाद्या ट्रीपला निघून जा. घरामध्ये किंवा जवळ न असणं हे तुमच्या पार्टनरला तुमची असण्याची जाणीव करून देईल
स्वतःची किंमत करायला शिका
पती-पत्नी हे अनेक वेळा कुटुंबांच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाहीत. अगदी स्वतःचं दिसणं म्हणा, तुमचा पेहराव म्हणा…! यामुळे देखील नात्यातला तोच तोच पणा कटूता निर्माण करत असतो. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा.
एखादी ट्रीप प्लॅन करा
कुठेतरी फिरायला नक्की जा ! यावेळी संपूर्ण कुटुंबाला नेण्याऐवजी फक्त आपल्या पार्टनरला घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. लहान मुलांची जबाबदारी कोणाकडे देता येत नसेल तर मुलांनाही सोबत घ्या. पण अशावेळी घरातील मोठ्या व्यक्तींना सोबत घेऊ नका. कारण हा वेळ पती-पत्नी म्हणून तुम्हाला एकमेकांसोबत घालवायचा आहे. बऱ्याच वेळा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये नेमका हाच वेळ पती-पत्नी एकमेकांना देऊ शकत नाहीत. किंवा अगदी चौकोनी कुटुंबामध्ये देखील नोकरी आणि घर या गणितामध्ये पती-पत्नी एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. या ट्रिपमध्ये फक्त एकमेकांना वेळ द्या.
सरप्राईज गिफ्ट द्या
पत्नीला किंवा आपल्या पतीला काय आवडतं त्यानुसार एखादा सरप्राईज गिफ्ट द्या, त्याची किंमत करू नका… अर्थात ते सरप्राईज गिफ्ट फार महागाचे असावे असं नाही, पण त्यांनी तुमच्या जोडीदाराला मानसिक आत्मबल मिळेल आणि तुमचं प्रेम दिसून येईल असं काहीतरी गिफ्ट द्या.
संवाद साधा
कुठेही जाता येत नाही तर अगदी घरामध्ये देखील एखादा सुट्टीचा दिवस घरातलं काम न करता एकमेकांसोबत वेळ घालवा, एकमेकांसोबत बोला… यामुळे देखील एकमेकांमध्ये आलेला दुरावा कमी होण्यास मदत होईल.
आजचा लेख केवळ स्व-अनुभवावर लिहिलेला आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा.