जालना : नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावरून मोठी घोषणा केली. ते म्हणाले होते की, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं जाईल. सरकारची सकारात्मक भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान आज राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटी येथे गेले होते. या ठिकाणी सरकारचे शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये बऱ्याच वेळ चर्चा पार पडली. परंतु अखेर एका शब्दावरून ही बैठक फिस्कटली आहे.
जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार, “नोंदी असलेल्या संबंधित नातेवाईकांना आणि रक्तातील सर्व सगेसोयरे यांना हे प्रमाणपत्र मिळावे. रक्ताचे सगे सोयरे हा शब्द आपण गृहीत धरला होता. आमच्या मामाला किंवा मावशी यांना देखील प्रमाणपत्र मिळावं अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. तथापि ” महिलेच्या जातीवरून तिच्या मुलांची जात ठरत नाही. वडिलांच्या दाखल्यावरूनच मुलांची जात ठरते. अशी भूमिका गिरीश महाजन यांनी मांडली. दरम्यान असा निर्णय घेता येणार नाही ! असं स्पष्टपणे गिरीश महाजन यांनी सांगितल्यानंतर एका शब्दावरून ही बैठक फिस्कटली आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील
यावेळी बैठक पार पडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले कि , “समाज म्हणून मुख्यमंत्री साहेबांचा शब्द पाळायला समाज कमी पडला नाही. त्यांचेच शब्द होते, तेच पाळत नाहीयेत. त्यानीच लिहिलेलं आहे, आम्हाला कशाला खोट ठरवतील. घोषणा मोठी झाली, घराला दरवाजा दिला, मात्र कडी कोंडा दिला नाही. 100 टक्के यात मार्ग निघेल. कायद्याच्या चौकटीत जे बसतेय तेच मागत आहोत. पुढील आंदोलनाचे 24 ला बघू, ते सरकारच्या हातात असल्याचं,” जरांगे म्हणाले.
काय म्हणाले गिरीश महाजन
यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले कि, महिलेवरून तिच्या मुलांची जात ठरत नाही. वडिलांच्या दाखल्यावरूनच मुलांची जात ठरते. न्या. शिंदेंच्या अध्यक्षतेखाली रात्रंदिवस काम सुरू आहे. शेवटच्या माणसाची नोंद बघेपर्यंत कार्यवाही चालूच राहणार. महिन्या दीड महिन्यात हा प्रश्न निकाली लागणार आहे. आम्हाला कायद्याने टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. मराठा आंदोलक मुंबईकडे जाण्याची बातमी आल्याने, काळजी म्हणून पोलिसांनी नोटीसा दिल्या आहेत. पोलिसांनी काळजी घेणे गरजेच आहे. पोलिसांना थोडी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने काळजी घ्यावी लागेल, असे गिरीश महाजन म्हणाले आहे.