भारतातली दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी गेल्या आठवड्यात थ्री वन फोर कॅपिटलच्या ‘द रेकॉर्ड’ या पॉडकास्टमध्ये इन्फोसिसचे माजी CFO मोहनदास पै यांच्याशी बोलताना असे वक्तव्य केले होते की भारताची उत्पादकता वाढवून देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी तरुणांनी आठवड्यात ७० तास काम केले पाहिजे. आणि त्यांच्या याच वक्तव्यामुळे सध्या चर्चेला उधाण आलं आहे तसेच सोशल मीडियावरही या बाबतीत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.त्यामुळे खरच ७० तास काम करणे शक्य आहे का कामगार कायदे याबाबतीत काय मार्गदर्शन करतात आणि इतर देशात कामाचे नेमके किती तास आहेत आणि हे संपूर्ण प्रकरण नेमके काय आहे जाणून घेऊ…
प्रसिद्ध उद्योजक नारायण मूर्ती यांनी द रेकॉर्ड’ या पॉडकास्टमध्ये बोलतेवेळी असे सांगितले की भारताची उत्पादकता ही जगात अतिशय कमी आहे त्यामुळे मागील दोन ते तीन दशकांत सर्वाधिक प्रगती केलेल्या अर्थव्यवस्थांशी जर भारताला स्पर्धा करावयाची असेल तर भारताला उत्पदकता तत्काळ वाढवावी लागेल व त्याकरता देशातील तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम करावे असा सल्ला त्यांनी दिला तसेच दुसऱ्या महायुद्धानंतर जपान व जर्मनीसारख्या देशांनी आपल्या कामाचे तास वाढवून कामात झोकून दिले होते. त्यामुळे आपल्यालाही चीन एव्हढी प्रगती गाठण्यासाठी तशी मेहनत घ्यावी लागेल असे मत व्यक्त केले आहे.तर मूर्तीं यांच्या या सल्ल्याचे काहींनी समर्थन केले आहे तर काहींनी काळजी व्यक्त करत मूर्ती यांच्या सल्ल्याचा विरोध केला आहे.हा सगळा वादविवाद होत असतानाच आता नारायण मूर्ती यांच्या पत्नी लेखिका सुधा मूर्तीं या पतीच्या विचारांना पाठिंबा देण्यासाठी समोर आल्या आहेत.१४ व्या टाटा लिट फेस्टसाठी मुंबईत आलेल्या सुधा मूर्ती यांनी एका वृत्तवाहिनीला या सगळ्यांवर प्रतिक्रिया देताना असे म्हंटले आहे की नारायण मूर्ती यांनी आठवड्यात ८० ते ९० तास काम केले आहे म्हणून त्यापेक्षा कमी काम कसे करायचे ते त्यांना माहित नाही तसेच त्यांचा खऱ्या मेहनतीवर विश्वास आहे आणि त्यांनी त्याच प्रकारे आयुष्य जगले त्यामुळे नारायण मूर्तींना जे वाटले तेच त्यांनी सांगितले व त्यांनी नारायण मूर्ती यांना पाठिंबा दिला आहे.
आता बघू नारायण मूर्ती म्हणाले त्याप्रमाणे खरच ७० तास काम करणे शक्य आहे का?
काही तज्ज्ञांच्या मते आठवड्यातील कामाचे ७० तास असणे हा सर्वांगीण विचार करण्याचा विषय आहे कारण यात कायदेशीर मुद्दे,उत्पादकता,जागतिक परिस्थिती,मानवी मर्यादा,कामाचा मोबदला म्हणजेच पगार किंवा daily wages आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे बेरोजगारीचा मुद्दा असे अनेक विषय संबंधित आहेत.तर या सगळ्या वर्क कल्चरमुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम हा अत्यंत कळीचा मुद्दा ठरतो. त्यामुळे ७० तास काम करणे शक्य असले तरी सोपे नाहीये. कारण यामुळे जरी भारताची उत्पादकता वाढली तरी देशातील आरोग्य समस्येत वाढ होणार हे नक्की.खरतर ब्रिटिश राजवटीत असणाऱ्या भारतात नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संघर्षानंतर रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली आणि रोजचे कामाचे सात ते आठ तास,म्हणजेच आठवड्याला ४२ ते ४८ तास असे समीकरण बनले आहे तर जगभरातही आठवड्यात कामाचे ४० ते ४४ तास अशी सरासरी आहे.तर आताही भारतात असणाऱ्या
कामगार कायद्यातील तरतुदीनुसार कामगारांना दररोज आठ ते बारा तासांच्या कामाची मर्यादा आहे त्यामुळे मूर्ती सांगतात त्याप्रमाणे आठवड्यात ७० तास काम करायचे झाल्यास दररोज बारा तास काम करावे लागेल पण जर पाच दिवसांचा आठवडा लागू असेल तर मात्र कामगारांना रोज १४ तास काम करावे लागेल.तर या सगळ्यावर काही अभ्यासकाचे असे मत आहे.
भारतातील ८० टक्के रोजगार असंघटित क्षेत्रात आहे. तर त्यातील कामगार किंवा व्यावसायिकांच्या कामाच्या स्वरूपानुसार दैनंदिन कामाचे तास हे वेगवेगळे आहेत. तसेच कोणत्याही कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या दैनंदिन कामावर काही शारिरिक मर्यादा असतात.त्यामुळे मग उरलेल्या २० टक्के कर्मचाऱ्यांनी आठवड्यात ७० तास काम केले तर त्यातून देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात किती आणि कशी भर पडणार हा मूळ प्रश्न आहे.आणि ही सगळी पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर नारायण मूर्ती यांनी मत व्यक्त करताना त्यांनी त्याच्या डोळ्यांपुढे प्रामुख्याने संघटित, व सेवा क्षेत्र आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगार असावेत, असे म्हणता येईल असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
आता बघू आजवर भारतात झालेल्या कामगार कायद्यात नक्की काय तरतुदी होत्या.
भारतात पहिल्यांदा १८८१ मध्ये कामगार कायदा झाला व त्यात वेळोवेळी सुधारणा झाल्या आहेत.साल १९११ च्या कायद्यात सर्व कामगारांच्या तासांवर निर्बंध घालण्यात आले तर साल १९४८ च्या कायद्याने ४८ तासांचा आठवडा आणि ९ तासांचा दिवस असे ठरवण्यात आले होते.तर खाणी, मळे, रेल्वे व इतर वाहतूक, गोदी कामगार यांच्यासाठी वेगवेगळे कायदे आहेत व त्याच्या कामाच्या स्वरुपाप्रमाणे ४८ ते ५४ तासांचा आठवडा आहे. त्याचप्रमाणे राज्यसरकारांच्या अखत्यारात दुकाने, हॉटेले व इतर व्यापारी संस्थांतील कामगारांसाठी वेगळे कायदे असून त्यांनुसार त्यांचे कामाचे तास ठरवून दिलेले आहेत.त्याच प्रमाणे ILO म्हणजेच आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने सुचविलेल्या शिफारशी देखील भारत सरकार अंमलात आणण्याचा प्रयत्न करत असते.
तर जुलै 2022 मधील नवीन कायद्यांनुसार आठवड्यातील एकूण कामाच्या तासांची संख्या 48 तासांपेक्षा जास्त असू शकत नाही. व कर्मचाऱ्यांना दररोज 12 तास काम करायला सांगितल्यास त्यांना तीन दिवस साप्ताहिक सुटी द्यावी लागेल आणि 48 तास हे 4 दिवस,5 दिवस किंवा 6 दिवसात पूर्ण करता येतील व हा चॉईस कर्मचाऱ्याचा असेल असे नियम आहेत मात्र व्यावसायिक सुरक्षितता,आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती या मध्ये कलम 25 (1) नुसार कर्मचार्यांना दररोज 8 तासांपेक्षा जास्त काम करण्यास सांगू नये.
तर कलम 25(1)(B) नुसार कंपनी कर्मचार्यांकडून एका दिवसात 12 तासांपर्यंत काम करून घेऊ शकते.तर कलम 26(1) नुसार कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून सहा दिवसांपेक्षा जास्त काम करू नये. मात्र, कलम 26(2) नुसार हा नियम शिथिल करण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला आहे
आता बघू इतर देशात कामाचे किती तास आहेत
तर जगातली अनेक विकसित देशात आज घडीला कमाल कामाची वेळ आठवडयात ४०-४१ तास इतकी कमी करताना दिसतात.फिनलंड या देशांत तर त्यापेक्षाही कमी तास आहेत.तर इतर अनेक देशांत पाच दिवसांचा आठवडा हा चार दिवसांवर कसा आणता येईल यावर सध्या चर्चा सुरू आहे. तसेच दुबईतही कामाचे तास ४० तासांवर आणले जात आहेत.तर असे असताना विकसित देशांच्या रांगेत बसण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतातील तरुणांना नारायण मूर्ती यांनी ७० तास काम करण्याची सूचना करणे हे किती योग्य आहे हे आता भारतीय लोकांनीच ठरवायचे आहे.कारण आपल्या आपल्या देशाची प्रगती जितकी महत्वाची आहे तितकीच आपली आरोग्यस्थिती सुध्दा महत्वाची आहे.
तर या सगळ्यांवर तुमची नेमकी काय प्रतिक्या आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा