क्रीडा क्षेत्रातून आज पुन्हा एक मोठी बातमी समोर येते आहे. काल कुस्तीपटू साक्षी मलिकने Sakshi Malik कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा केली. आणि आज कुस्तीपटू बजरंग पुनियाने Bajrang Punia आपला पद्मश्री पुरस्कार सरकारला परत करण्याची मोठी घोषणा केली आहे. ‘मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत आहे…!’ अशा आशयाचे पत्र बजरंगने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.
या पत्रामध्ये बजरंग पुनियाने लिहिले आहे की, “माननीय पंतप्रधान, मला आशा आहे की तुम्ही बरे आहात. देशसेवेत व्यस्त राहाल. तुमच्या या प्रचंड व्यस्ततेत मला तुमचे लक्ष आमच्या कुस्तीकडे वेधायचे आहे. या वर्षी जानेवारीमहिन्यात देशातील महिला कुस्तीपटूंनी कुस्ती संघटनेवर कब्जा करणाऱ्या ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते, जेव्हा त्या महिला कुस्तीपटूंनी आपली चळवळ सुरू केली तेव्हा मीही त्यात सामील झालो होतो.
आंदोलक पैलवान जानेवारीमध्ये त्यांच्या घरी परतले, जेव्हा त्यांना सरकारकडून ठोस कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले. पण तीन महिने उलटले तरी ब्रिजभूषण यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला नाही. मग एप्रिल महिन्यात आम्ही पैलवान पुन्हा रस्त्यावर उतरलो आणि दिल्ली पोलिसांनी किमान ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात एफआयआर नोंदवावा म्हणून आंदोलन केले, पण तरीही ते चालले नाही, म्हणून आम्हाला कोर्टात जाऊन एफआयआर नोंदवावा लागला.
जानेवारीत तक्रारदार महिला कुस्तीपटूंची संख्या १९ होती, ती एप्रिलपर्यंत ७ वर आली. म्हणजेच या तीन महिन्यांत आपल्या ताकदीच्या जोरावर ब्रिजभूषण सिंग यांनी १२ महिला कुस्तीपटूंना न्यायाच्या लढाईत पराभूत केले होते. हे आंदोलन ४० दिवस चालले. या ४० दिवसांत एक महिला कुस्तीपटू मागे हटली. आम्हा सर्वांवर खूप दडपण येत होतं. आमच्या आंदोलनस्थळाची तोडफोड करण्यात आली आणि आम्हाला दिल्लीतून हाकलून देण्यात आले आणि आंदोलन करण्यास मज्जाव करण्यात आला. जेव्हा असं झालं, तेव्हा आम्हाला काय करावं सुचत नव्हतं. त्यामुळे आम्ही आपली पदके गंगेत फेकण्याचा विचार केला. असे देखील बजरंग यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. आता यावर केंद्र सरकार काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचे आहे.