Mental Stress : मानसिक तणाव हा विषय आजच्या वेगवान जीवनशैलीमध्ये चर्चिला गेला पाहिजे असा सर्वात महत्त्वाचा विषय झाला आहे. वेगवान जीवनशैलीमध्ये अगदी तीन वर्षाच्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंतचा समावेश होतो आहे. आता तुम्हाला वाटेल की अगदी लहान मुलांमध्ये तणाव कसला ? तर आज-काल तिसऱ्या वर्षांमध्येच मुलांना शाळेमध्ये पाठवले जाते एवढ्या लहान वयात मुलं आई वडिलांपासून लांब राहतात. शाळेतील वातावरण इतर मुलांची संगत, अभ्यास आणि स्पर्धेचा तणाव, सकाळी अर्ध्या झोपेतून उठून शाळेत जाणे, एक्स्ट्रा करिक्युलमसाठी क्लासला जाणे अशी अनेक कारणे लहान मुलांचे निरागस पण हिरावून घेत आहेत.
तर दुसरीकडे तरुण मुलांच्या वाईट सवयी, बेरोजगारी, लग्न न होणे अशा एक ना अनेक मानसिक तणावातून ज्येष्ठ तणावात आयुष्य जगत आहेत. आणि यामध्ये सर्वात जास्त भरडला जातो आहे तो आजचा तरुण आणि प्रौढ वर्ग… ज्यांच्यावर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी असल्याकारणाने मानसिक, शारीरिक आर्थिक सर्वच तणावांना सोबत घेऊन चालावं लागत आहे.
आज-काल गुन्हेगारी जगतामध्ये सर्वसामान्यांचे देखील नाव येत आहे. घरातले किरकोळ वाद एवढे विकोपाला जात आहेत की एक तर आत्महत्या तरी केली जाते आहे किंवा रागाच्या भरात हत्या तरी होते आहे. यासाठी आजचा हा खास लेख…
तुम्हाला जर ताणतणाव वाटत असेल तर अनेक उपाय तुम्ही आजपर्यंत वाचले असतील. त्यातले जे योग्य वाटतील ते हमखास लवकरात लवकर अमलात आणा. त्यापैकी आज मी काही सांगणार आहे हे देखील करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुमच्या मानसिक आरोग्याचा परिणाम तुमच्या कौटुंबिक, शारीरिक आणि आर्थिक बाजूंवर होणार नाही.
एखादे संकट जर आले आहे आणि ते संपतच नसेल तर एक गोष्ट मनाला सांगा. जसा जन्म आणि मृत्यू सत्य आहे. तसेच आलेलं संकट कधी ना कधी परत जाणार आहे किंवा संपणार आहे. त्यामुळे त्या योग्य वेळेची वाट पहा आणि लढत राहा. एवढेच तुम्ही करू शकता. हे जेव्हा तुम्ही मनाला पटवून द्याल तेव्हा तुम्हाला थोडा धीर येऊ शकेल.
संकट कितीही मोठ असलं तरी आत्महत्या हा त्यास पर्याय नाही. त्याने केवळ संकट तुमच्या पासून कदाचित लांब जाईल, पण कधीही समूळ नष्ट होणार नाही. तुमच्या घरच्यांना तुमचा नसण्याचा आणि त्या संकटाचा मोठा सामना करावा लागेल. त्यापेक्षा याच आयुष्यात लढा, कुटुंबाची मदत घ्या, एकमेकांशी बोला…
तुम्हाला ज्या देवतेवर विश्वास वाटत असेल किंवा अगदी कोणत्याही देवतांवर विश्वास नसेल तर कोणीतरी असं एक मनामध्ये असायलाच हवं ज्याच्याशी तुम्हाला अंतर्मनातून संवाद साधता येईल. विश्वास ठेवा आणि आपल्या इष्ट देवाशी तुमच्या संकटाविषयी बोला. दिवसभरातला काही वेळ नामस्मरणामध्ये झाला घालवा. यातून तुमचं संकट भलेही लगेच संपणार नाही, पण तुम्हाला मानसिक बळ हमखास मिळेल.
ताणतणाव घालवण्याचे काही लहान उपाय लक्षात घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवा, आपल्या लहान मुलांशी लहान होऊनच खेळा, एखादा हलकाफुलका चित्रपट पाहायला बाहेर जा, सहलीला जा, योगासन-मेडिटेशन करा हे काही हलकेफुलके उपाय आहेत ज्यातून तुम्ही काही काळ का होईना तुमचा मानसिक ताण विसराल.
आज-काल अनेक ठिकाणी स्पा सेंटर आहेत. त्यासह पंचकर्म देखील तुम्ही करू शकता. योग्य जाणकार व्यक्तीकडून शरीराची झालेली योग्य मालिश देखील तुमचा ताण हमखास कमी करते.
तुमच्या रागावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण एखाद्या मानसिक त्रासात असतो तेव्हा समोरच्या व्यक्तीचा अगदी सामान्य कारणाने देखील प्रचंड राग येतो. यासाठी तुम्ही मेडिटेशन करणे तर गरजेचे आहेच. परंतु जेव्हा तुम्ही अशा मानसिक तणावाला सामोरे जात आहात तेव्हा कमी बोलणे हा सर्वात उत्तम उपाय आहे.अर्थात जेव्हा वादाचा प्रसंग निर्माण होतो तेव्हा बोलणे टाळा, इतर वेळी आपल्या जवळच्या लोकांशी मनमोकळे गप्पा मारा.
आजचा लेख तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा मानसिक त्रासातून ब्रेक घेण्यासाठी तुम्ही नेमका कोणता उपाय करतात हे देखील कळवा. या लेखामध्ये दिलेले उपाय हे सामान्य आहेत. आवश्यक असल्यास वैद्यकीय सल्लाच घेणे फायद्याचे ठरेल.