ब्रिटिश राजवटीत असलेल्या भारतात राहून ज्या परदेशी व्यक्तींनी भारताची भूमी हीच आपली कर्मभूमी मानली आणि येथील सामजिक जडणघडणीत आपले अमूल्य असे योगदान दिले त्या उल्लेखनीय व्यक्तींमध्ये भगिनी निवेदिता हे नाव अग्रणी आहे. कारण निविदेता यांनी स्त्री शिक्षणासारख्या सामाजिक क्षेत्रात महान कार्य तर केलंच,पण एक ब्रिटिश नागरिक असूनही त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्त्यांना अगदी उघडपणे मदत करून ब्रिटिश सरकारचा रोषही ओढवून घेतला. लेखिका,शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या याच भगिनी निवेदिता स्वामी विवेकानंदांच्या मानसकन्या होत्या हे आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल. आज २८ ऑक्टोबर भगिनी निवेदिता यांची जयंती आहे,त्यांना अभिवादन म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याविषयीच्या फारशा माहिती नसलेल्या गोष्टी आज जाणून घेणार आहोत…
स्वामी विवेकानंदांची लंडनमधील व्याख्याने ऐकून हिंदू तत्त्वज्ञान आणि भारतीय संस्कृतीवर प्रभावित झालेल्या भगिनी निवेदिता यांचे पूर्वाश्रमीचे नाव होते मार्गारेट एलिझाबेथ नोबल. उत्तर आयर्लंडमधील एका छोट्या शहरात २८ ऑक्टोबर १८६७ साली त्यांचा जन्म झाला होता.परंतु पुढे काही वर्षांनी त्यांचे वडिल सॅम्युएल यांच्या अकाली निधनानंतर मार्गारेट यांच्या आई मेरी यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर मार्गारेट साल १८८४ मध्ये या लंडन येथे आल्या व एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करू लागल्या.
पुढे साल १८९५ मध्ये स्वामी विवेकानंद इंग्लंडला गेले असता त्यांनी त्यांच्या व्याख्यानांतून मांडलेले तत्त्वविचार हे नव्या युगाला अत्यंत उपयुक्त ठरू शकतात असे मार्गारेट नोबल यांना जाणवले आणि त्या अत्यंत प्रभावित झाल्या.आणि या पुढे शिक्षण आणि समाजसेवेसाठी स्वतःचे आयुष्य समर्पित करायचे हे ध्येय उराशी बाळगून २८ जानेवारी १८९८ रोजी मार्गारेट भारतात आल्या आणि स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या झाल्या.त्यांनी कलकत्यात राहून हिंदू चालीरीती आणि परंपरा समजावून घेतल्या.खरतर ही साधना करणे त्यांना अवघड होते पण मार्गारेट यांनी आपले पणाने ह्या सर्व गोष्टी समजून घेतल्या आणि हिंदुस्थान हेच आपले आजीवन कार्यक्षेत्र बनवायचे हा निश्चय केला.आणि त्यामुळेच २५ मार्च १८९८ रोजी स्वामी विवेकानंदानी मार्गारेट यांना विधिपूर्वक ‘ब्रह्मचारिणी’ व्रताची दीक्षा देऊन त्यांचे नाव ‘निवेदिता’ असे ठेवले.इथे निवेदिता या नावाचा अर्थ म्हणजे आपले जीवन ईश्वरीय कार्याला समर्पित केलेली व्यक्ती.आणि त्यावेळी कोलकात्याच्या जनतेला आपल्या या पाश्चिमात्य शिष्याची ओळख करून देताना स्वामी विवेकानंद यांनी ‘इंग्लंडकडून भारताला मिळालेली ही एक अमोल देणगी’या शब्दात करून दिली.पुढे १८९९ मध्ये कलकत्त्यात आलेल्या प्लेगच्या साथीत निवेदिता यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली.तसेच रामकृष्ण मिशनला मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी बऱ्याच देशांचा दौरा केला.
तर साल १९०२ मध्ये पुण्यात येऊन त्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या चाफेकर बंधूंच्या आईच्या चरणांना स्पर्श करून त्यांच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकी लावली.पूढे त्याच वर्षी स्वामी विवेकानंदांचे निधन झाल्यावर निवेदितांनी राष्ट्रजागृती,आणि भारतीय स्वातंत्र्य या विषयांवर पूर्ण बंगालमध्ये भाषणे दिली,तसेच निवेदितांनी स्वतंत्रता चळवळीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेत स्वदेशी वस्तूंचा वापर करा असा पुरस्कार केला.तर साल १९०५ मध्ये झालेल्या बंगालच्या फाळणीनंतर ‘एक अपरिचित कंठस्वर’ हा लेख लिहून तो स्टेट्समन या वृत्तपत्रात प्रकाशित केला.तसेच कला,विज्ञान, आणि शिक्षण या सर्व गोष्टी यापुढे दुसऱ्या कोणत्या हेतुसाठी नाही तर भारतमातेच्या पुनर्उभारणीच्या हेतुसाठीच करायला हव्यात असा मोलाचा विचार निविदेता यांनी मांडला.आणि त्यांच्या याच कार्यामुळे जनता त्यांना sister म्हणजेच भगिनी या नावाने हाक मारू लागली.खरतर पारतंत्र्यातील राज्यकर्त्यांकडून त्यांना कुठलाही मान सन्मान मिळाला नाही पण जनसामान्यांनी मात्र त्यांचा भगिनी निवेदिता या विशेषणाने सन्मान केला.आणि याच नावाने त्या विश्वविख्यात झाल्या.अशा प्रकारे भारतातील संस्कृती समजून घेण्यासाठी समर्पित झालेल्या मारर्गेट नोबल यांचा याहून मोठा सन्मान कोणता असेल.