मुंबई : एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर दुपारच्या सुमारास RBI, HDFC आणि ICICI बँकेत बॉम्ब ठेवला असल्याचा धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे बँकेसह मुंबई शहरात 11 ठिकाणी बॉम्ब पेरले असल्याची देखील धमकी या मेलमध्ये देण्यात आली आहे. आज दुपारी दीड वाजता बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचं या मेलमध्ये लिहिण्यात आलं होतं. अद्याप तरी अशी कोणतीही वाईट घटना घडली नसली तरी मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेत.
आरबीआयच्या कार्यालयासह एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकेमध्ये हे बॉम्ब पेरले आहेत, त्यासह मुंबईमध्ये 11 ठिकाणी बॉम्ब पेरले असल्याची धमकी या मेलमध्ये देण्यात आली असल्याचे समजते आहे. यासह आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण या दोघा जणांच्या राजीनाम्याची मागणी देखील या मेलमधून करण्यात आली आहे. खिलाफत इंडिया या आयडीवरून हे धमकीचे मेल करण्यात आले आहेत. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी बॉम्ब स्कॉडच्या मदतीने प्रमुख भाग बारकाईनं तपासले आहेत. तरी कोणत्याही अनुचित प्रकार घडू शकेल अशी वस्तू आढळून आलेली नाही. तथापि मुंबई पोलीस कसोशीन या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मेलमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप
बॉम्ब हल्ला करण्याचे हे मेल खिलाफत इंडिया या आयडी वरून करण्यात आले आहेत. यानंतर बॉम्ब स्कॉडच्या मदतीने पोलिसांनी परिसर पिंजून काढला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरीही हा मेल कुठून आला ? तसेच या मागचा नेमका उद्देश काय ? याचा शोध पोलीस घेत आहेत. विशेष म्हणजे या मेलमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वात मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच भारतीय बँकांना देखील लुटले गेले असल्याचे या मेल मध्ये म्हंटल गेलं असल्याचं समजतं आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.