आता हे काय नवीन ? छगन भुजबळ म्हणतात, “मनोज जरांगे यांच्या संदर्भातील सर्व भाषण आणि वक्तव्य मागे घेतो; देव सुद्धा त्यांना घाबरतो..! नेमकं काय म्हणाले, वाचा ही बातमी
नाशिक : ज्येष्ठ नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आजच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. आज छगन भुजबळ नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ” मी मनोज जरांगे यांच्या संदर्भातील सर्व भाषण आणि वक्तव्य मागे घेतोय. आणि जरांगेंच्या मतांशी आपणही सहमत आहे. सरकारने फक्त त्यांचं ऐकायचं. देव सुद्धा त्यांना घाबरतो ! असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. इतके दिवस मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या मागणीला कडाडून विरोध करणारे छगन भुजबळ अचानक हे काय म्हणतायत असं तुम्हाला वाटत असेल, पण थांबा हे वक्तव्य करताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांच्या त्या वक्तव्याला उपरोधिक टोला लगावला आहे.
तर झालं असं आहे की, सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि सगेसोयरे या शब्दावरून ही बैठक फिसकटली होती. सरकारची भूमिका आहे कि ओबीसी आरक्षणाला धक्का न लागत मराठा आरक्षण दिले जावे. पण जरंगेंना हे मान्य नाही. यावरून आज मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की, आता देव जरी मध्ये आला तरीही मराठा आरक्षणाला ओबीसी मधून देण्यास अडवू शकणार नाही. मनोज जरांगे यांच्या या वक्तव्यावरून छगन भुजबळ यांनी थेट उपरोधक भाषेत हल्लाबोल केला आहे.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, “जरांगेंचं ऐकायला पाहिजे. मंत्र्यांचे दोन-चार बंगले तिथे बांधले पाहिजेत. त्यांना रोज अभिनव कल्पना येतात, त्यांचा आदर राखला पाहिजे. देवसुद्धा त्यांना घाबरतो, सासू-सासऱ्यांचे मित्र सर्वांना दाखले द्या.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “माझी भुमिका अशी आहे की, जरांगे यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. सर्वांना आरक्षण द्यायला पाहिजे. आपण जरांगे यांचं ऐकलं पहिजे. नाहीतर मोर्चा घेऊन ते येतील. व्याह्याचे व्याही व्याह्याचे व्याही असं सर्वांना आरक्षण दिलं पाहिजे. ते पुढे जाऊन शिक्षणाबाबत शेतकऱ्यांच्याबाबतसुद्धा केलं पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की, सरकारनं वाटाघाटीचा घोळ घालू नये. ते सांगतात सरकार मान्य करत आहे. मी तर जरांगे यांना सपोर्ट करतोय. सरकारनं फक्त त्यांचंच ऐकायचं, देवसुद्धा त्यांना घाबरतो.”
“जरांगे बोलतील आणि त्यांच्या हातात सगळं आहे. 7 ते 8 कोटी मराठा त्यांच्या हातात आहे. ताबडतोब त्या ठिकाणी एका निवृत्त न्यायाधीशांचं कार्यालय सुरू करा आणि त्या ठिकाणी लगेच माझा जामीन रद्द करून टाका. जरांगे यांनी सरकारला वेठीस धरलं नाही, सरकारनं जरांगे यांना वेठीस धरलं आहे, पुढच्या मेळाव्यात त्यांच्या बाजूनं मी भाषणं करणार आहे.