नाशिक : सध्या राज्यामध्ये शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान नाशिकमध्ये आज महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी मात्र दांडी मारली.
लोकसभा निवडणुकीपासूनच मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीतून आणि वक्तव्यातून ते महायुतीवर नाराज असल्याचे स्पष्ट दिसून येत असताना देखील याबाबत त्यांनी कधीही रोखठोक भूमिका मांडलेली नाही. परंतु आजच्या या बैठकीला त्यांनी अनुपस्थित राहून पुन्हा एका नवीन चर्चेला वाचा फोडली आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी मंत्री छगन भुजबळ हे इच्छुक होते. परंतु नाशिकमध्ये लोकसभेसाठीचा तिढा देखील मोठा होता. दरम्यान आता शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये देखील महायुतीत मोठा तिढा पाहायला मिळतो आहे. या निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटानं किशोर दराडे यांना उमेदवारी दिली असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महेंद्र भावसार यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा नवीन वाद समोर आला आहे. अशातच आता या बैठकीसाठी छगन भुजबळ उपस्थित न राहिल्याने चर्चेला उधाण आले आहे.
या बैठकीला मंत्री छगन भुजबळ उपस्थित का राहिले नाहीत असा सवाल माध्यमांनी भुजबळ यांना विचारला असता ते म्हणाले की, ” वड्याचे तेल वांग्यावर असं सध्या सुरू आहे. मी नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जातात. प्रत्येक बैठकीला मी जाणे शक्य नसते. काही मिटींगला आमचे पदाधिकारी जातात. ” अशी प्रतिक्रिया यावेळी छगन भुजबळ यांनी दिली आहे.