अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके MP Nilesh Lankay यांनी नुकतीच पुण्यामध्ये कुख्यात गुंड गजा मारणे Gajanan Marne याची भेट घेतली. आणि त्याच्याकडून सत्कार देखील स्वीकारला यावरून आता राजकीय वर्तुळातून निलेश लंके यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी देखील गजा मारणे याची भेट घेतली होती. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जोरदार टीका करण्यात आली होती. दरम्यान आता शरद पवार यावर काय भूमिका घेतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी निलेश लंके यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा गजा मारणे कडून सत्कार; राजकीय वाद पेटणार !
अमोल मिटकरी म्हणाले की, ” शरद पवार गटाचे खासदार निलेश लंकेंनी गुंड गजा मारणेची घेतलेली भेट ही अहमदनगर लोकसभेत त्याने केलेल्या मदतीचे आभार मानायला होती का? गजा मारणेने बारामती आणि नगरमध्ये शरद पवार गटाला मदत केली का? पार्थ पवारांनी मारणेच्या भेटीनंतर अजित पवारांनी केलेल्या कानउघडणीसारखी लंकेंचीही कानउघडणी शरद पवार गट करणार का?
यावर निलेश लंके यांनी देखील प्रतिक्रिया देताना मिटकरी यांना थेट प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, ” अमोल मिटकरी यांना काही परिस्थिती माहित आहे का? जरा परिस्थितीची जाणीव करून घ्या. पक्षाने मिडियासमोर बोलण्यासाठी ठेवले आहे म्हणून तुम्ही काहीही बोलणार का?” असा टोला निलेश लंके यांनी अमोल मिटकरी यांना लगावला आहे.