Maharashtra Politics Latest News : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड आज (२ जुलै) झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. (Ajit Pawar takes oath as Deputy Chief Minister of Maharashtra) अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार देखील उपमुख्यमंत्री असणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा देणार की अजित पवार बंडखोरी करुन सरकारमध्ये सामील होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. तसेच काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपद सोडण्याची देखील इच्छा दर्शवली होती. येत्या काळात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदावर दिसतील अशा चर्चा देखील सुरु होत्या. मात्र आज अजित पवारांनी थेट सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले आहे. त्यासोबत थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर त्यांनी दावा ठोकला आहे.
सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय का? (Why did Ajit Pawar become deputy CM)
सरकारमध्ये सामील झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ पातळीवर आमच्या चर्चा व्हायच्या. देशातील आणि राज्यातील परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश मजबुतीनं पुढं जात आहे. त्यामुळे विकासाला महत्व दिलं पाहिजे, असं आमचं मत होतं. राज्याचा विकास करणं, केंद्राकडून निधी मिळण्याबाबत पाहणं अशी भुमिका राहील.”
अजित पवारांना कोणाचा पाठिंबा?
अजित पवार यांनी शुक्रवारी (30 जून) विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा दिला असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. रविवारी (२ जुलै) त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल हे देखील अजित पवार यांच्यासोबत असल्याचे दिसले.
अजित पवारांसह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, धर्माराव बाबा आत्राम, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, अनिल पाटील या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यासोबतच येत्या काळात मंत्रीमंडळाचा विस्तार केला जाणार आहे तसेच त्यात आणखी काही जणांना मंत्रीपद मिळणार, अशी देखील माहिती अजित पवार यांनी दिली आहे. (MLA with Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार देखील आपल्यासोबत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.
मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या आमदारांशिवाय इतरही बहुसंख्य आमदारांना सरकारमध्ये सामील होणार असल्याचा हा निर्णय मान्य असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे. अजित पवारांचा गट नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच सरकारमध्ये सामील झाला असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. तसेच येत्या काळात होणाऱ्या निवडणुका ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या निवडणुक चिन्हाखाली लढवणार, असं देखील ते म्हणाले.
शरद पवारांची भूमिका काय? (Sharad Pawar reaction after Ajit Pawar took oath)
अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा या निर्णयाला पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलं आहे. “अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला याची मला माहिती नव्हती. हा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही. १९८० साली मला अनेक सहकारी सोडून गेले होते. त्यानंतर मी पुन्हा पक्ष बांधला. राज्यातील जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. ६ जुलै रोजी पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती मात्र त्यापूर्वीच काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली”, असं शरद पवार यांनी सांगितलं.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत भ्रष्टाचारावरुन टिका केली होती. आज त्याच राष्ट्रवादी पक्षाच्या काही सहकाऱ्यांना मंत्रीमंडळात शपथ देण्यात आली, असं शरद पवार म्हणाले.
शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र होणार?
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बंड केल्यानंतर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात अनेक महिने प्रलंबित होता. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिल्यानतंर विधानसभेच्या अध्यक्षांना अपात्रतेबाबतचा निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र या आमदारांना अपात्र केल्यास सरकार कोसळेल आणि त्यामुळेच राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारमध्ये सामील करुन घेण्यात आले अशी देखील चर्चा सुरु आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अपात्र केल्यास सरकारला काहीही धोका नसेल, असे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा अनेकांना धक्का बसला होता. त्यांच्या नेतृत्वातील सरकार १ वर्ष पूर्ण करत असताना गेल्या काही दिवसांपासून शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यासोबतच अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्री बनण्यासाठीची इच्छा वेळोवेळी व्यक्त केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. या १६ आमदारामध्ये एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद येत्या काळात जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अजित पवार यांनी सध्या जरी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी लवकरच ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदी दिसतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिवसेनेप्रमाणे फूट?
अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी झाल्याची चर्चा सुरु आहे. अजित पवार यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच सरकारमध्ये सामील झाल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि पक्ष आपल्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच येत्या काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याचे देखील ते पत्रकार परिषदेत बोलले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मात्र पक्षावर कोणी दावा केला तरी मी जनतेमध्ये जाणार, असं सांगितलं आहे. “महाराष्ट्रातल्या जनतेवर माझा विश्वास आहे, यापूर्वी मी वेगवेगळ्या चिन्हावर निवडणुका लढवल्या आहेत. १९८० साली मी ज्या पक्षाचं नेतृत्व करत होतो त्यातील ५८ आमदार सोडून गेले होते. तेव्हा देखील पक्ष बांधला आणि मोठ्या संख्येत पुन्हा आमदार निवडून आणले”, अशी आठवण शरद पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितली.