HEALTH BLOG : दारू आणि नैराश्य हे समीकरण फार जुनं आहे. ज्या लोकांना दारूचं व्यसन Alcohol addiction लागलं आहे किंवा अगदी आहारी गेले आहेत त्यांच्यासाठी हे नैराश्य नावाचं भूतच डोक्यावर बसलेलं असतं. प्राथमिक पायरीवर जर तुमच्या नैराश्यावर तुम्ही काम करू शकलात तर या व्यसनाच्या मोठ्या दरीतून तुम्ही नक्की बाहेर येऊ शकाल.
दारूच्या व्यसनामुळे घरच्या घर उध्वस्त होतात. कुटुंबाची पूर्ण वाताहात होते. आर्थिक मानसिक कुचंबना तर होतेच, त्यात शारीरिक नुकसानीने अनेकांचे जीव देखील गेले आहेत. त्यामुळे दारूचे व्यसन लागेपर्यंत वाट पाहण्यापेक्षा तुमच्या डोक्यात सुरू असणाऱ्या नैराश्यावर मात करा.
खरंतर आयुष्य म्हटलं की संकट ही येतच राहणार. ही संकट एक प्रकारे तुमची परीक्षा पाहत असतात कुठलेही संकट हे आयुष्यभर तुमच्या मागे लागल आहे असं होत नसतं. पण जर त्या संकटाला तुम्ही पाठ दाखवून पळाल तर नक्कीच ते केवळ तुमचा पाठ लागच करीत राहील आणि वाढत राहील. त्यामुळे आलेल्या संकटाला धीराने वेळेत तोंड द्यायला शिका. माझ्याच समोर हे आव्हान का ? हे असं संकट का ? हा विचार करण्यापेक्षा त्या संकटाशी कसा लढा द्यायचा याचा विचार करा. आणि आयुष्यात संकट कधीही थांबणार नाहीत पण ज्या पद्धतीने सूर्यास्तानंतर पुन्हा सूर्योदय आणि सूर्योदयानंतर पुन्हा सूर्यास्त होत असतो तसेच आनंद आणि त्यानंतर पुन्हा एखादा दुःख आणि दुःखानंतर पुन्हा एकदा एखादं सुख हेच आयुष्याचं चक्र आहे हे मनाला पटवून द्या.

अनेक जण दारूच्या एवढे आहारी जातात की अनेक औषधांचा त्यांना आधार घ्यावा लागतो बऱ्याच वेळा या औषधांमुळे शरीरावर आणखीन वेगळे आणि भयानक परिणाम देखील होतात आणि तरीही दारूच्या व्यसनातून पूर्णपणे सुटका होईल असे होत नाही त्यामुळे जर तुम्ही प्राथमिक पातळीवर दारूचे सेवन करत असाल तर थांबा हा लेख पूर्ण वाचा.
अनेक जण मनातलं नैराश्य विसरण्यासाठी दारूचे सेवन करतात. यामुळे कदाचित तुम्ही त्या वेळेत नैराश्य विसराल पण ते संपत कधीही नाही. त्यामुळे त्या नैराश्याला आयुष्याचा भाग आहे हे समजून पुढे चला.
तुम्ही जर एखाद्या संकटामुळे तणावात असाल तुम्हाला नैराश्य आले असेल तर सर्वात पहिले काही गोष्टी करा,
- एकटे कधीही बसू नका. कुटुंबीयांसोबत किंवा जी व्यक्ती तुम्हाला आवडते, जिच्याशी बोलल्याने मन हलकं होतं. प्रसन्न होतं अशा व्यक्तीसोबत बोला किंवा अगदी केवळ सोबत रहा पण एकटे राहू नका.

- रोज दिवसातून एकदा ग्रीन टी प्यायला सुरुवात करा. अनेक जणांना ग्रीन टी आवडत नसेल. परंतु ग्रीन टीमध्ये थायमिन आणि अमिनो ऍसिड असतं. त्यामुळे तुमचे मानसिक आजार देखील बरे होऊ शकतात.

- तुमच्या संकटाबाबत घरातील मोठ्यांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा दुःख , तणाव व्यक्त केल्यामुळे कमी होतो आणि आनंद व्यक्त केल्यामुळे द्विगुणीत होतो.
- आठवड्यातून एक दिवस तरी मंदिरात जायला विसरू नका. अगदी कोणत्याही मंदिरात जा आणि पाच मिनिटं तिथे शांत बसून रहा. मनात केवळ श्रद्धा असू द्या. तुम्हाला नक्की मनशांती मिळेल.

- सात्विक भोजन घ्या, खूप मसाल्याचे, फास्ट फूड अशा पदार्थांचे सेवन टाळा.

- जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही तणावात आहात, तेव्हा अंघोळ करायला विसरू नका ! आता तुम्ही म्हणाल की यात आंघोळीचा कसा संबंध येतो ? आणि केली असेल तर पुन्हा का करायची ? तरी या प्रक्रियेचा स्वतः अनुभव घेऊन बघा. जेव्हा तुम्हाला वाटेल की विनाकारण एखाद्या अति विचाराने तुमची मनस्थिती खराब होते आहे तर उठा आणि आंघोळ करा !
- जेवणाच्या वेळा ठराविक ठेवा. त्याच वेळेत जेवण करा अन्यथा जेवण टाळा. रात्रीच जेवण काही केल्या आठ वाजे नंतर करू नका.

- दारू ही शरीराला अपायकारकच आहे. अनेक जण याचे फायदे तुम्हाला सांगतील. पण ती केवळ तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक, मानसिक, शारीरिक संकटात टाकत आहे हे लक्षात ठेवा.