BOLLYWOOD DIARIES : बॉलीवूडची टाईमलेस ब्युटी आणि सदाबहार अभिनेत्री म्हणजेच रेखा. कोणाला खरं वाटेल रेखा 69 वर्षाची आहे? अगदी लहानपणापासून अभिनय क्षेत्रात उतरलेल्या रेखा यांनी आजही सिनेसृष्टीत आपलं नाव टिकवून ठेवलंय. रील लाईफशिवाय त्यांचं रियल लाईफही नेहमीच चर्चेत राहिलं. मग कधी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या प्रेमाचे किस्से रंगले तर कधी 13 वर्षांनी लहान असलेल्या अक्षय कुमारसोबतही त्यांचं नाव जोडलं गेलं. पण अमिताभ यांच्या मनात रेखा यांच्याविषयी एवढी कटुता कधी आणि कशी निर्माण झाली माहितीय का ? तसंच रेखांना कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. त्या मार खाऊन सुपरस्टार झाल्या आहेत, असं त्यांनीच एकदा म्हंटलंय. काय आहे तो किस्सा तेही जाणून घेवूयात…
10 ऑक्टोबर हा रेखांचा वाढदिवस आणि यंदा त्या 69 वर्षाच्या झाल्यायत. तर दुसऱ्याच दिवशी बॉलिवूडचे ‘शहेनशाह’ अर्थात अमिताभ बच्चन यांचाही वाढदिवस असतो. तसं तर रेखा आणि बिग बींची लव्ह स्टोरी अख्ख्या देशानं ऐकलीय. पण अमिताभ रेखा यांचा राग का करू लागले हे अनेकांना माहीत नाही. मग त्यानंतर निरनिराळ्या चर्चा रंगू लागल्या. त्यावेळचा एक किस्सा असा की बिग बींसाठी रेखांनी अनेक मंदिरांत जाऊन पूजापाठ केले, देवाला साकडं घातलं. हा तो काळ आहे जेव्हा अमिताभ बच्चन मृत्यूशी झुंज देत होते. त्यावेळी रेखा यांनी अमिताभ यांना भेटू नये अशी बंदीच घालण्यात आली होती. 1982 साली ‘कुली’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान झालेल्या अपघातानंतर अमिताभ बच्चन मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात अॅडमिट होते.
या काळात त्यांच्या पत्नी जया बच्चन यांनी त्यांची खूप काळजी घेतली. प्रत्येक जण त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होता.
एवढंच काय तर स्वतः इंदिरा गांधी सुद्धा अमिताभ यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. मात्र तिथे फक्त रेखा यांना परवानगी नव्हती. असं म्हणतात की तशी जया बच्चन यांचीच इच्छा होती. पण एका रिपोर्टनुसार, शेवटी एके दिवशी पांढऱ्या रंगाची साडी नेसून एकदम साध्या वेशात रेखा हॉस्पिटलला पोहोचल्याच. आपल्या प्रियकराची अशी अवस्था पाहून त्या फार खचल्या. अशा वेळी देवाकडे प्रार्थना करण्याखेरीज त्यांच्या हातात काहीच नव्हतं.
असं म्हणतात की तेव्हा रेखा यांनी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली. त्यांनतर तिरुपतीला जाऊनही साकडं घातलं. पण ज्यावेळी अमिताभ यांची प्रकृती सुधारली त्यानंतर त्यांच्या मनात रेखा यांच्याविषयी कटुता निर्माण झाली. याला कारण म्हणजे अमिताभ मृत्यूशी झुंज देत होते तेव्हा रेखा पार्ट्यांमध्ये बिझी होती असं सांगत कुणीतरी जया आणि अमिताभ यांचे कान भरले होते, असं म्हंटलं जातं.
शिवाय त्या काळात रेखा आणि संजय दत्त यांच्या अफेअरच्या अफवाही पसरल्या होत्या. बातम्यांनुसार या सगळ्यामुळे अमिताभ यांच्या मनातला द्वेष वाढू लागला आणि रेखा आणि त्यांच्यातला दुरावाही वाढतच गेला.
विशेष म्हणजे या सगळ्याचा रेखा यांच्या करियरवर कधीच फरक पडला नाही. आजवर त्यांनी 400 हून जास्त चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकलीयत. पण त्यांना कधीही अभिनेत्री व्हायची इच्छा नव्हती. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत रेखांनी त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा किस्सा सांगितला होता. त्यांचे वडील साऊथचे प्रसिद्ध अभिनेते होतेच, शिवाय आईही प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री होत्या.
तर रेखाही एका रात्रीत स्टार बनल्या होत्या. पण त्यांना कधीच या क्षेत्रात यायचं नव्हतं. पण त्यांच्या आईचीच खूप इच्छा होती. त्यामुळे मार खात खात त्या स्टार बनल्या असा किस्सा त्यांनी या मुलाखतीत सांगितला. मग काही वर्षं उलटल्यानंतर त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्या या क्षेत्रात रुळल्याही आणि कायमस्वरूपी आपलं स्थानही निर्माण केलं. अगदी वयाच्या 69 व्या वर्षी सुद्धा सौंदर्याच्या बाबतीत हल्लीच्या टॉपच्या अभिनेत्रींनाही त्या मागे टाकतात.