नागपूर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशना Nagpur Winter Session दरम्यान अनेक महत्वाच्या विषयांवर तोडगा काढण्यासाठी चर्चा होते आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ३ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात ‘शाळेत चला अभियान’ राबविण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली.
मंत्री केसरकर म्हणाले की, १७ ऑगस्ट, २०२३ ते ३१ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये राज्यात सर्वत्र सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात राज्यात १६२४ मुले व १५९० मुली असे एकूण ३२१४ बालके शाळाबाह्य आढळून आली आहेत. या सर्वेक्षणानुसार संपूर्ण मुंबईत एकूण ३५६ बालके शाळाबाह्य आढळून आले असून ही सर्व ३५६ बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. ठाणे जिल्ह्यात ३८० बालके शाळाबाहय आढळून आले असून त्यापैकी २९७ बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत, रायगडमध्ये ३८ बालके शाळाबाहय आढळून आले असून ती सर्व बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. तर पालघर मध्ये ९२८ बालके शाळाबाहय आढळून आले. सर्वेक्षणाच्या कालावधी मध्ये ७१ बालके व सर्वेक्षणाच्या कालावधी नंतर ९४ अशी एकूण १६५ बालके शाळेत दाखल करण्यात आली आहेत. उर्वरीत ७६३ बालकांना देखील नजीकच्या शाळेत दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
राज्यात विशेषत: पालघर, ठाणे आणि बुलढाणा या जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यासंदर्भात विशेष लक्ष दिले जाईल. शालेय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण आणि नगरविकास विभागाच्या समन्वयातून शाळांची दुरुस्ती, शाळेतील विद्यार्थी संख्येत वाढ आदी बाबींवर लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिक्षक भरती प्रक्रिया सुरू
राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हानिहाय बिंदूनामावली अंतिम करण्यात आली आहे. आता विद्यार्थांना पसंती क्रमांक देण्यास सांगितले जाईल. दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री केसरकर यांनी दिली. या वेळी सदस्य ॲड. आशिष शेलार, नाना पटोले, ॲड. यशोमती ठाकूर, योगेश सागर आणि बाळासाहेब थोरात यांनी उपप्रश्न विचारले.