बीड : यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. यामध्ये बीड लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे Pankaja Munde यांच्या पराभवाने भाजपला देखील मोठा धक्का बसला आहे. दरम्यान आंबेजोगाई येथील पंकजा मुंडे यांच्या एका कट्टर समर्थकाने थेट आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान आज पंकजा मुंडे यांनी कट्टर समर्थक असलेले आणि नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केलेले पांडुरंग सोनावणे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. आंबेजोगाई तालुक्यातील दिघोळ आंबा येथील पांडुरंग सोनवणे यांच्या घरी कुटुंबीयांची भेट घेऊन पंकजा मुंडे यांनी सांत्वन केलं.
दरम्यान कुटुंबीयांशी भेट झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, ” मी हिंमतीने लढणारी आहे, पण सध्या या गोष्टींनी प्रचंड डगमगली आहे. या कुटुंबाच्या मागे मी उभी राहणार आहे. पण आत्महत्येसारख्या गोष्टीचं मी समर्थन करणार नाही. मी लोकांना आवाहन करते की, त्यांनी असं काही करु नये. आपल्या लहान लेकरांना, परिवाराला वाऱ्यावर सोडून असे आत्महत्या करणे हे मला पसंत पडणार नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की, तुमचं प्रेम व्यक्त करायचं असेल तर मी नक्की तुम्हाला त्याची संधी देईल. पण आपला जीव गमावू नका. तुमचा जीव म्हणजे माझा जीव आहे असं समजून जपा तो, शपथ आहे या निराशेतून बाहेर या, जसा नेता असतो तसा कार्यकर्ता असला पाहिजे. तुमचा आक्रोश आणि प्रेम तुमच्या वर्तवणुकीतून, कामातून आणि कष्टातून व्यक्त करा, ” असे आवाहन पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची मोर्चे बांधणी सुरु; मोदी- शहांचे ‘ हे ‘ डावे उजवे हात महाराष्ट्रावर वॉच ठेवणार !