दररोज मार्केटमध्ये होणाऱ्या उलाढालीचा हिशोब ठेवणाऱ्या शेअर बाजारांपैकी एक म्हणजे मुंबई शेअर बाजार. मुंबई शेअर बाजाराची (Bombay Stock Exchange) भव्य इमारत पाहता तुम्हाला कदाचित हे एकूण आश्चर्य वाटेल की, जगात ११ व्या क्रमांकावर येणाऱ्या मुंबईच्या या शेअर बाजाराची सुरुवात एका वडाच्या झाडाखाली झालेली आहे. एका वडाच्या झाडाखालून चक्क आशिया खंडातील सगळ्यात जुन्या आणि जगात ११ व्या क्रमांकावर असलेल्या या शेअर बाजाराचा हा प्रवास कसा झाला ते पुढे सविस्तर जाणु घेऊयात.
शेअर बाजाराची सुरुवात कशी झाली? (How Bombay Stock Exchange was formed)
भारतात सुरुवातीच्या काळात शेअर बाजाराचं ज्ञान जास्त लोकांना नव्हतं. १८५० साली भारतात पहिल्यांदा शेअर बाजाराची सुरुवात झाली, असं मानलं जातं. केवळ ४ गुजराती आणि १ पारशी व्यक्तींनी एकत्र येऊन युरोपमधून शेअर बाजाराचं ज्ञान घेतलं आणि ही संकल्पना भारतात राबवण्याचं ठरवलं. पूर्वीच्या काळी मुंबईत चर्चगेट परिसरातील टाऊन हॉलजवळ एक वडाचं झाड होतं. सध्या ती जागा ‘हार्निमन सर्कल’ या नावाने ओळखली जाते. त्या वडाच्या झाडाखाली बसून हे ५ जण वेगवेगळ्या धंद्यांची ट्रेडिंग (दलाली) करायचे. त्यांचं स्वतःचं ऑफिस वगैर असं काही नव्हतं. या लोकांच्या कामाच्या वेळाही ठरलेल्या नसायच्या. त्यावेळी प्रामुख्याने कापसाचा व्यापार जास्त होत असे.
नंतरच्या काळात लोकांना शेअर बाजाराबद्दल माहिती व्हायला लागली. अनेकांनी त्याचा अभ्यास करुन त्यातलं ज्ञान मिळवलं. काही काळातचं टाऊन हॉल परिसरातील त्या वडाच्या झाडाखाली ट्रेडर्सची संख्या वाढली. दलालांची संख्या वाढली तसा लोकांचा वावर देखील वाढला. त्यामुळे झाडाखाली चालणारा शेअर बाजार एखाद्या कार्यालयात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. १८७४ साली वेगवेगळ्या ठिकाणी दलालांनी आपली कार्यालयं उघडली. ज्या ठिकाणी त्यांनी ही कार्यालयं सुरु केली ते ठिकाण सध्या ‘दलाल स्ट्रीट’ म्हणुन ओळखलं जातं.
वर्षभरानंतर म्हणजेच १८७५ साली दलालांनी एकत्र येत ‘द नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर असोसिएशन’ ही संस्था स्थापन केली. त्यानंतर या संस्थेने दलाल स्ट्रीटवर एक मोठं कार्यालय खरेदी केलं. तेच कार्यालय सध्या मुंबई शेअर बाजार (BSE) या नावाने ओळखलं जातं. ९ जुलै १८७५ साली स्थापन झालेल्या या शेअर बाजाराला यंदा १४८ वर्षे पूर्ण झाली आहेत.
उद्योगपती प्रेमचंद रायचंद जैन हे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे संस्थापक मानले जातात. जैन यांना ‘मुंबईचे कॉटन किंग’ असं देखील म्हटलं जातं. नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशनचे ते संस्थापक सदस्य होते. त्याकाळातील मुंबईच्या सर्वात मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये प्रेमचंद यांचे नाव घेतले जायचे.
शेयर बाजाराला मान्यता
‘द नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर असोसिएशन’ या संस्थेद्वारे अनेक ट्रेडर्सनी केवळ १ रुपयात शेअर बाजाराची सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात या शेअर बाजाराचं काम फक्त दुपारी बारा ते दोन या वेळेत होत असे, तर सकाळच्या वेळेत खरेदी-विक्रीच्या नोंदी होत असे. पण या शेअर बाजाराला सरकारची अधिकृत मान्यता मिळायला मात्र अनेक वर्षे लागली.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ३१ ऑगस्ट १९५७ ला सिक्युरिटीज कॉन्ट्रक्ट ॲक्ट १८५६ नुसार या शेअर बाजाराला मान्यता दिली गेली. अश्या प्रकारे ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’ हे भारतातील पहिले मान्यताप्राप्त अधिकृत शेअर मार्केट अस्तित्वात आलं.
१९८६ मध्ये BSE सेन्सेक्स सुरु झाला. त्यानंतरच्या ४ वर्षातच म्हणजे १९९० मध्ये सेन्सेक्सने १००० अंकाची पातळी गाठली होती.
शेयर बाजारची प्रगती
‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’च्या सुरुवातीच्या काळात सुविधा नसल्याने शेयर्सची खरेदी-विक्री हे लिलावाद्वारे तोंडीच होत असे. हे शेअर्स खरेदी-विक्री करण्यासाठी लोकांना थेट बाजारात जावं लागत होतं. शेअर बाजारात खरेदी-विक्री काही पैसेवाले लोकंच करू शकत होते, तर सामान्य लोकांना शेअर्सची देवाणघेवाण करता येत नव्हती.
संगणक आणि इंटरनेटच्या वापराने आता ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन पार पडते. त्यामुळे आता खरेदीदार आणि विक्रेता एकमेकांना न ओळखता देखील शेअर्सची खरेदी-विक्री करू शकतात. त्यासोबतच आता घरबसल्या मोबाईल App आणि डीमॅट खात्यामुळे अवघ्या काही सेकंदात शेअर बाजारातील लाखोंचे व्यवहार पूर्ण होतात. शेअर बाजारातील गुंतवणुकीत गेल्या काही काळात सामान्य जनतेचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसत आहे.
शेयर बाजारावर अंकुश
१९९२ साली हर्षद मेहता प्रकरण समोर आल्यानंतर १२.७७ टक्क्यांनी शेयर बाजार खाली पडला होता. यानंतर शेअर बाजाराच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी १९९२ च्या कायद्या नुसार सेबीला अधिकार प्राप्त झाले आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाने १९९४ मध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराच्या कामकाजास प्रारंभ केला. मुंबई (बॉम्बे) स्टॉक एक्सचेंज (बीएसई) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) हि दोन प्राथमिक एक्सचेंजेस् भारतात आहेत. या व्यतरिक्त २२ प्रादेशिक स्टॉक एक्सचेंजेस असून बीएसई व एनएसई हीच महत्वाची दोन एक्सचेंजेस आहेत व यांच्या माध्यमातून भारतातील ८०% व्यवहार दर दिवशी केले जातात.