पुणे : बदलत्या काळानुसार प्रत्येकच क्षेत्रात महिला आपल्याला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना पाहायला मिळतात. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन Women’s Day Special साजरा केला जातो. हा दिवस खास महिलांच्या समान हक्कासाठी, जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. परिवाराची असतील किंवा स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिला देखील जीवाचं रान करत असतात. स्वतःची स्वप्ने पूर्ण नाही झाली तर निदान आपल्या मुलांची तरी स्वप्ने पूर्ण व्हावे त्याकरिता महिला कायम झटत असतात. महिला दिनानिमित्त पुण्यातील या डेरिंगबाज महिला रिक्षाचालक ज्योती हुंबे यांच्यासोबत खास चर्चा केली आहे आमच्या प्रतिनिधी स्नेहल निमगिरी यांनी… पहा हा खास रिपोर्ट
ज्योती हुंबे या सध्या पुण्यामध्ये रिक्षा चालक म्हणून काम करतात. त्यांचे बालपण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गेलं. घरामध्ये तीन मुली, आणि ज्योती या घरातील सर्वात मोठी मुलगी त्यामुळे बारावीच्या पुढे त्यांना शिक्षण घेता आलं नाही. घराच्या जवळपास कॉलेज नाही आणि गावातील लोकांच्या लग्नाबाबतच्या चर्चांमुळे ज्योती यांचं बारावीनंतर लगेच लग्न करून देण्यात आलं. कोल्हापूर हे त्यांचे सासर असून काही कारणांनी त्या त्यांच्या परिवारासह पुण्यामध्ये स्थायिक झाल्या.
सुरुवातीला पुण्यामध्ये त्यांचे मिस्टर रिक्षा चालक चे काम करायचे आणि त्या बिलिंग चे काम करायच्या. कोरोना मध्ये बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या त्यातच ज्योती यांची देखील नोकरी गेली. फक्त एका रिक्षा वरती पुण्यातील भाड्याच्या घरात पैशाच्या अडचणी येऊ लागल्या त्यामुळे ज्योती यांनी चहाची टपरी टाकली. ती टपरी उघड्यावरती आणि टेबल वरती त्यांनी तीन वर्षे चालवली. चहाच्या टपरीची जागा स्वतःची नसल्यामुळे त्यात देखील अडचणी येऊ लागल्या.
आता स्वतःचं काहीतरी पाहिजे ज्यात स्वतःला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं काहीतरी करायचं म्हणून ज्योती हुंबे यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. ज्योती हुंबे म्हणतात रिक्षाचालकाच्या कामात देखील अडचणी आहेत मात्र अडचणींना बाजूला करत आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. जशास तसे उत्तर देखील देता आलं पाहिजे. त्या म्हणतात मला एक चार वर्षांची लहान मुलगी आहे तिला मी कोणत्याही गोष्टीत कमी पडू देत नाही सर्व काही तिच्यासाठी करत आहे.
माझ्या मुलीला मी वाघिणीसारखीच ठेवणार आणि तिला प्रत्येक क्षेत्रात उतरवणार असा आत्मविश्वास देखील ज्योती हुंबे यांनी यावेळी व्यक्त केला.
Tags –