National Doctors Day 2023 : दरवर्षी 1 जुलै हा दिवस भारतात राष्ट्रीय डॉक्टर्स दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टरांना आणि त्यांच्या पेशाला सलाम करण्याचा आजचा दिवस. हा दिवस देशाचे महान डॉक्टर बीसी रॉय यांना समर्पित आहे. या दिवशी लोक डॉक्टरांचे त्यांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या सन्मानार्थ अभिनंदन करतात. त्यांच्या सेवा आणि समाजाप्रती समर्पण केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे दरवर्षी देशात राष्ट्रीय वैद्यकीय दिनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. भारतरत्न डॉ.बिधानचंद्र रॉय म्हणाले की, डॉक्टरही लष्कराच्या जवानांप्रमाणे देशाचे रक्षण करतात’.
कोण होते बिधानचंद्र रॉय
डॉ. बीसी रॉय यांचे पूर्ण नाव बिधानचंद्र रॉय होते. त्यांचा जन्म १ जुलै १८८२ रोजी पाटणा, बिहार येथे झाला. त्यांनी कोलकत्ता मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण (एमबीबीएस आणि एमडी) केले. १९४२ मध्ये ते कोलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू असताना जपानी लढाऊ विमाने रंगूनवर बॉम्बफेक करत होते. यादरम्यान त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी खास बंकर बांधले जेणेकरुन युद्धाच्या अशांत काळातही वर्ग भरता येतील. डॉ. रॉय कठीण काळात अनेक मदतकार्यांचा एक भाग बनले. त्यांच्या सेवेची दखल घेऊन त्यांना १९४४ मध्ये डॉक्टरेट ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. रॉय यांना १९६१ मध्ये देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नही मिळाला होता.
महात्मा गांधींचे मित्र आणि वैयक्तिक डॉक्टर
ते उत्तम समाजसेवक, उत्तम राजकारणी, स्वातंत्र्यसैनिकही होते. ते पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्रीही होते. स्वातंत्र्याच्या काळात त्यांनी असहकार आंदोलनात भाग घेतला. १ जुलै हा डॉ. बी.सी. रॉय यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस देशात डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. भारत सरकारने 1991 साली राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा करण्यास सुरुवात केली. असे म्हटले जाते की बीसी रॉय हे महात्मा गांधींचे मित्र आणि वैयक्तिक डॉक्टर होते आणि त्यांनी 1942 च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान त्यांच्यावर उपचार केले.
डॉक्टर्स डे थीम २०२३
दरवर्षी देशात डॉक्टर्स डे साजरा केला जातो, तो कोणत्या ना कोणत्या थीमवर आधारित असतो. या वर्षी राष्ट्रीय डॉक्टर दिनाची थीम ‘सेलिब्रेटिंग रिझिलियन्स अँड हीलिंग हँड्स’ अशी निश्चित करण्यात आलीये. कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करण्यासाठी रात्रंदिवस काम करत असलेले डॉक्टर, हे लक्षात घेऊन ही थीम ठेवण्यात आलीये.