जालना : जालन्यातील अंतरवाली सराटी गावातले मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर येते आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू करण्यात आल्या असून सलाईन लावण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट पासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत आहेत. मराठा आरक्षणाचा अध्यादेश येत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्ट पासून उपोषणाला सुरुवात केली आहे. “आरक्षणाचा आदेश निघत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही, आणखी चार दिवसांची मुदत देऊन उपोषण सुरूच राहील” असं मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी म्हटलं होतं. ते म्हणाले की ” आता शेवटचं लढतोय, यावेळी आरक्षण नाही मिळालं तर एक तर माझी अंतयात्रा निघेल नाही तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल. मी सगळ्यांना सांगितले, बाळांनो मी जगलो तर तुमचा आणि मेलो तर समाजाचा. त्यामुळे मी असा मेलेला बरा, मी 4 फेब्रुवारीपासून लढतोय…!” असं ते म्हणाले आहेत.
राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी
दरम्यान जालन्यातील अंतरवाली सराटी गावातले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठी हल्ला केला होता. त्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी आणि आणि जनतेने राज्य सरकारवर टीकेची जोड उठवली आहे. राज्य सरकारकडून आता मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी सुरू आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने पाच सप्टेंबरला मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी या गावात जाऊन भेट देखील घेतली आहे. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली संदिपान भुमरे , माजी आमदार अर्जुन खोतकर हे देखील उपस्थित होते. यावेळी हे आंदोलन मागे घेण्याची या शिष्टमंडळाने विनंती देखील केली असल्याचे समजते आहे.