मुंबई : कुणबी-मराठा आरक्षणाबाबत आजची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले होते. हे उपोषण “मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे” या मागणीसाठी करण्यात आले आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला यश आले आहे. जरांगे यांच्या मागणीचा विचार करून राज्य सरकारने जीआर काढला आहे. याबाबत राज्य सरकारने कालच घोषणा केली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं की, ज्यांच्याकडे निजामकालीन कुणबी अशा नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल. त्यानुसार आज अधिकृत जीआर काढण्यात आला आहे. याबाबत राज्य सरकारने मनोज जरांगे यांना देखील उपोषण मागे घेण्याचे विनंती पत्र देखील पाठवले आहे.
मराठवाड्यातील काही जिल्हे हे निजाम संस्थेत होते. त्यावेळी शेती करणाऱ्या मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले जात होतं. पण नंतर हे संस्थान महाराष्ट्रात विलीन झालं तेव्हापासून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. त्यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जातीचा जात प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी गेल्या दहा दिवसांपासून उपोषण करून सुरूच ठेवली होती.
दरम्यान मराठा समाजातील ज्या व्यक्तींनी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या जात प्रमाणपत्राची मागणी केली असेल,अशा व्यक्तींनी सादर केलेल्या निजामकालीन महसुली अभिलेखात शैक्षणिक अभिलेखात तसेच अन्य अनुषंगिक समर्थनीय अभिलेखात जर त्यांच्या वंशावळीचा उल्लेख कुणबी असा असेल तर अशा व्यक्तींनी सादर केलेल्या पुराव्यांची काटेखोर तपासणी करून त्यांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल या शासनाची मान्यता देण्यात येत आहे. असे या जीआर मध्ये म्हटले आहे.