मराठा समाजाच्या आवश्यक अशा आरक्षणासाठी राज्यभर तीव्र लढा सुरु आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या, मन विचलित करणाऱ्या, दुःखद व दुर्दैवी आत्महत्या अतिशय वेदनादायी आहेत. अत्यल्प झालेल्या पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात असून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्नेहीजणांनी आपला वाढदिवस साधेपणाने व सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
दुष्काळी पार्श्वभूमी, मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन आणि एकूण सामाजिक परिस्थिती पाहता यावर्षी वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय आपण घेतला आहे.
माझ्या प्रती असलेला आदरभाव, प्रेम, आपुलकी याची मला कल्पना आहे. आपले आशिर्वाद व शुभेच्छा नेहमीच माझ्या बरोबर आहेत. आपल्या शुभेच्छांनी मला काम करण्यासाठी मोठी ऊर्जा मिळते. हारतुरे, पुष्पगुच्छ आदींवर पैसे खर्च करू नयेत. त्या ऐवजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून वाढदिवस साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
वाढदिवसानिमित्त अनाठाई खर्च करण्याऐवजी त्याच रकमेतून गरजवंत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, शेतकऱ्यांना विविध माध्यमातून मदत, आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबीर अशाप्रकारे समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करावे असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विनम्र आवाहन केले आहे.