गुजरात : गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचं निधन झालं आहे. अहमदाबाद मधील खाजगी रुग्णालयात वयाच्या 49 व्या त्यांनी वर्षी अखेरचा श्वास घेतला. पराग देसाई अहमदाबादमधील त्यांच्या घराजवळ इस्कॉन अंबली रोडवर सकाळी वॉकसाठी गेले होते, यावेळी त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. या अपघातात ब्रेन हॅमरेज झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांना उपचारांसाठी अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
देसाई यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग देसाई यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करून त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पराग देसाई हे गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेडमध्ये कार्यकारी संचालक पदावर कार्यरत होते. पराग यांनी अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील लाँग आयलँड युनिव्हर्सिटीमधील एमबीए पदवी शिक्षण पूर्ण केलं होतं. वाघ बकरी चहाची विक्री, वितरण आणि निर्यात यामध्ये मोलाची भूमिका बजावत ब्रँडला आणखी उंचीवर नेले होते.