छत्रपती संभाजी नगर : मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण दिले जावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पाच महिन्यांपासून राज्य सरकारच्या विरोधात कडवट लढा उभा केला आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार यावर जरांगे पाटील ठाम आहेत.
दरम्यान जरांगे पाटील यांनी आत्तापर्यंत दोन वेळा आमरण उपोषणाचे शस्त्र उगारले होते. राज्य शासनाने कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दोन्हीही वेळी ठराविक वेळेची मुदत देऊन जरांगे पाटील यांनी उपोषण थांबवले होते. राज्यभरात सातत्याने दौरे आणि सभा देखील सुरू होत्या. हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण या प्रमुख मुद्द्यावर काहीतरी तोडगा निघेल असे वाटत होते. परंतु अद्याप देखील ठाम उत्तर न मिळाल्याने जरांगे पाटील यांनी आता मुंबईकडे मोर्चा वळवला आहे.
मनोज जरांगे पाटील हे आज छत्रपती संभाजी नगरमध्ये एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही ओबीसी कुणबी हे सिद्ध झालं मग आम्हाला उगाचच स्वतंत्र आरक्षणाच्या फुफाट्यामध्ये कशाला टाकत आहात, असं आमचं म्हणणं आहे. नाही तर पोरांचे हाल होतील. आम्ही ते नाकारलं नाही पण ते आरक्षण टिकलं पाहिजे, ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे. नाही तर तोच पाढा पुन्हा वाचावा लागेल. सरकार आम्हाला २० तारखेपर्यंत आरक्षण देईल, असे वाटत नाही. त्यामुळे आम्ही मुंबईला जात आहोत. आम्ही मुंबईत पोहोचल्यानंतर मराठा समाज हा वारुळातील मुंग्यांसारखा बाहेर पडेल. मग तिकडे आम्हाला मारलं तरी आम्ही मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
आम्ही मागासवर्ग आयोगाचे मुद्दे वाचले, ते खूप मोठं आहे. आमचं नियोजन पण सुरू आहे. तो ५० टक्क्यांच्या वरचा प्रश्न आहे. मुंबईतील मोर्चासंदर्भात व मार्गासंदर्भात उद्या सविस्तर माहिती देऊ. आम्ही मुंबईला चालत जाणार आहोत. आम्ही मरायलाही तयार आहोत. मात्र, सरकारने ठरवलं ते सरकार करते. जनतेच्या मनाप्रमाणे होत नाही. अंतरवाली सराटीत उपोषण सोडताना त्यांनी जे शब्द दिले त्या शब्दाला जागा. अन्यथा आम्ही मुंबईला जाण्यासाठी ठाम आहोत, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे.