तेलंगणात सत्तेवर असणाऱ्या भारत राष्ट्र समिती (BRS) ने महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. पक्षातर्फे राज्यात अनेक ठिकाणी बैठका, सभा यांचं आयोजन गेल्या काही काळात केलं जात आहे. राज्यातील वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी बीआरएसची वाट धरल्याचं देखील पाहायला मिळत आहे. ((BRS Maharashtra leaders) आता मात्र चक्क विमान पाठवून राष्ट्रवादीच्या एका नेत्याला तेलंगाणात भेटायला बोलावल्याची चर्चा राज्यात सुरु आहे. (Bharat Rashtra Samithi in Maharashtra)
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते भारत भालके यांचे चिरंजीव भगिरथ भालके हे सध्या बीआरएस च्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. बीआरएस पक्ष तेलंगाणात सध्या सत्तेत आहे. हा पक्ष महाराष्ट्रात पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये निर्णायक ठरु शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. या पक्षात प्रवेश केलेल्या अनेक नेत्यांनी यापूर्वी झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत घेतलेली मते निर्णायक ठरली असल्याने येत्या निवडणुकीत देखील त्यांचा प्रभाव दिसू शकतो.
आतापर्यंत BRS मध्ये प्रवेश केलेली महाराष्ट्रातील नेतेमंडळी (BRS Leaders in Maharashtra)
१. हर्षवर्धन जाधव
छत्रपती संभाजीनगरातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी २०१९ ची लोकसभा निवडणुक लढवली होती. या निवडणुकीत जाधव यांना अडीच लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती. जाधव यांच्यामुळेच माजी खासदार चंद्रकांत खैरेंना २०१९ च्या निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं, असं बोललं जातं.
२. यशपाल भिंगे
नांदेडचे यशपाल भिंगे यांनी देखील बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. यशपाल भिंगे यांनी देखील २०१९ मध्ये लोकसभा निवडणुक लढवली होती. वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी दिड लाखापेक्षा जास्त मतं मिळवली होती. त्यानंतर भिंगे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या यादीत भिंगे यांचं नाव तेव्हा असल्याची चर्चा देखील होती.
३. डॉ. विजयप्रकाश ठोंबरे
भाजपच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांनीदेखील आपल्या समर्थकांसह बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक अशी ठोंबरे यांची ओळख आहे.
४. अण्णासाहेब माने आणि संतोष माने
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार अण्णासाहेब माने यांच्यासह त्यांचा मुलगा संतोष माने यांनीदेखील आपल्या समर्थकांसह बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. अण्णासाहेब माने २ वेळा शिवसेनेकडून गंगापूर मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. त्यांचे चिरंजीव संतोष माने यांनी २०१९ साली राष्ट्रवादीकडून याच मतदारसंघातून विधानसभा निवडणुक लढवली होती.
५. प्रदीप साळुंखे
राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव प्रदीप साळुंखे यांनीदेखील पक्षाला सोडचिठ्ठी देत बीआरएसची वाट धरली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी प्रदीप साळुंखे यांनी बंडखोरी केली होती. पक्षाने विक्रम काळे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर साळुंखे यांनी त्याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर प्रदीप साळुंखे यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे.
६. सय्यद अब्दुल कदीर मौलाना
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अल्पसंख्याक शाखेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेले सय्यद अब्दुल कदीर मौलाना यांनी देखील बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य या मतदारसंघामधून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती.
या प्रमुख नेत्यांसह शेतकरी संघटनेच्या आणि इतर पक्षाच्याही अनेक नेत्यांनी आतापर्यंत बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमावर्ती भागात म्हणजे नांदेड जिल्ह्यातील देगलूर, किनवट, धर्माबाद व यवतमाळ आणि चंद्रपूरच्या सीमावर्ती भागातील बीआरसची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. तेलंगणात मिळणाऱ्या सुविधा आणि विविध योजना यांमुळे लोकांचा कल तिकडे वाढलेला पाहायला मिळत आहे. बीआरएसमध्ये येत्या काळात देखील राज्यातील काही आजी-माजी आमदार प्रवेश करु शकतात अशी चर्चा आहे. मागच्या निवडणुकांमध्ये प्रभावी ठरलेल्या आणि सध्याच्या पक्षात नाराज असलेल्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा या पक्षाचा प्रयत्न सध्या तरी दिसून येत आहे.
बीआरएस पक्षाचा इतिहास (BRS Party history)
केसीआर यांनी २००१ मध्ये वेगळ्या तेलंगणा राज्याची मागणी करत टीडीपी पासून विभक्त होऊन स्वतःच वेगळा पक्ष स्थापन केला होता. या पक्षाचं नाव तेलंगाणा राष्ट्र समिती (टीआरएस) असे ठेवले होते. सुरुवातीच्या काळात KCR यांच लक्ष्य फक्त तेलंगाणाच होतं. मात्र आता संपूर्ण देशात पक्षवाढीची तयारी सुरु असल्याने त्यांनी पक्षाचं नाव बदलून भारत राष्ट्र समिती असं केलं आहे.