पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ सुरू आहे. पुण्याचे तात्या वसंत मोरे यांनी 18 वर्षे मनसे बरोबर एकनिष्ठ राहिल्यानंतर अखेर मनसेला सोडचिठ्ठी दिली आणि आज वसंत मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित आहे. या सह अहमदनगर पारनेरचे आमदार निलेश लंके हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये आज प्रवेश करणार असल्याचं राजकीय सूत्रांनी सांगितल आहे.
विशेष म्हणजे पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयाचा मोठ्या प्रमाणावर सुशोभीकरण देखील करण्यात आले. आजच्या या पक्षप्रवेशा बरोबरच निलेश लंके यांच्या पुस्तकाचा प्रकाशन देखील होणार असल्याचे समजते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वप्रमुख नेते पुण्याच्या पक्ष कार्यालयात उपस्थित आहेत. तर काही वेळातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरू होणार आहे. त्यानंतरच सर्व काही स्पष्ट समजू शकेल.