ज्ञानवापी प्रकरण : ज्ञानवापी प्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने मोठा निकाल आज घोषित केला आहे. वाराणसी जिल्हा न्यायालयाने बुधवारी व्यास कुटुंबीयांना ज्ञानवापी येथील व्यासजी तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली. १९९३ पासून ३१ वर्षे तळघरातील पूजा बंद होती. वाराणसीचे डीएम 7 दिवसांच्या आत पुजारी नियुक्त करतील, त्यानंतर व्यास कुटुंबीय पूजा सुरू करू शकतील, असे कोर्टाने आदेशात म्हटले आहे.
ज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्षाची बाजू मांडणारे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले, “व्यासांच्या तळघरात हिंदू पक्षाला पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाला ७ दिवसांत व्यवस्था करावी लागणार आहे. सात दिवसांत पूजेला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले. प्रत्येकाला पूजा करण्याचा अधिकार असेल. आम्ही अलाहाबाद उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करणार आहोत. न्यायालयाने सुनावणी घेतली तर आम्ही तिथे तयार राहू. “
ज्ञानवापीयेथील व्यासजींचे तळघर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून त्यात पूजेचा अधिकार देण्यात यावा, अशी मागणी करताना पं. सोमनाथ व्यास यांचे नातू शैलेंद्र पाठक यांनी दाखल केलेल्या खटल्यात जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी मंगळवारी निकाल राखून ठेवला होता.

गेल्या वर्षी २५ सप्टेंबर रोजी शैलेंद्रकुमार पाठक यांच्यावतीने ज्ञानवापीच्या दक्षिणेकडील इमारतीत तळघर असल्याचा दावा करत दावा दाखल करण्यात आला होता. प्राचीन मंदिराचे मुख्य पुजारी व्यास घराण्याचे हे मुख्य आसन आहे. वंशपरंपरेनुसार पुरोहित व्यासजी ब्रिटिश राजवटीतही तेथे वास्तव्यास होते. आणि डिसेंबर १९९३ पर्यंत त्यांनी तेथे पूजा केली होती, याचे पुरेसे पुरावे आहेत. धार्मिक महत्त्वाच्या अनेक प्राचीन मूर्ती व इतर साहित्य तेथे आहे.