नाशिक :… सुरुवात झाली खरी ती दोन वर्षांपूर्वी ! नाराजी नाट्य, उपमुख्यमंत्री पदाची शपथ, शिवसेनेसोबत बंड करून भाजपसोबत हात मिळवणे, मग काकांची साथ सोडून राष्ट्रवादी फुटली ! महाराष्ट्रानं या दोन वर्षांमध्ये मोठं राजकारण पाहिले. त्यामुळे या लोकसभेमध्ये देखील रोजच काही ना काही वादंग पाहायला मिळत आहेत. यामध्ये दोन मतदारसंघ प्रचंड गाजले आहेत. त्यातला पहिला आहे तो म्हणजे बारामती मतदारसंघ आणि दुसरा आहे तो म्हणजे नाशिक मतदार संघ !
आता तुम्हाला वाटेल की पुन्हा नाशिकमध्ये काय घडलं ? भुजबळांनी माघार घेतली, काही जण थेट अपक्ष उभे राहिले, मग हेमंत गोडसेंना आता उमेदवारी तर जाहीर झाली…
तर घडलं असं की खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये महायुतीचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी अनेक पदाधिकारी आणि मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाषण झालं. उमेदवार हेमंत गोडसे यांचे भाषण झालं पण सामान्यांचे लक्ष होतं ते म्हणजे व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर…
नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून हेमंत गोडसे हे ही निवडणूक लढवत आहेत. पण या बॅनरवर त्यांचा फोटो कुठे दिसलाच नाही. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील नाशिकच्या जागेवर आपला दावा सांगत होते. परंतु त्यांचा देखील फोटो या बॅनरवर दिसून आला नाही. त्यामुळे नवीनच चर्चा सुरू झाली.
तर या बॅनरच मूळ असं होतं की हा मेळावा आयोजित केला होता विजय करंजकर यांनी…विजय करंजकर हे काही दिवसांपर्यंत शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख होते. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ते नाशिक लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि त्यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी शिंदे गटात प्रवेश करेपर्यंत हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. विजय करंजकर यांनीच हा मेळावा भरवला होता. परंतु हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी बॅनर मात्र छापले गेले होते. त्यामुळे या बॅनरवर हेमंत गोडसे यांचा फोटो नाही असे स्पष्टीकरण दिल जात आहे. ज्यात खरं किती खोटं किती याची कल्पना नाही. कारण विजय करंजकर आणि हेमंत गोडसे यांच्यामधून विस्तव देखील जात नाही. हे उभ्या नाशिक न पाहिलेल आहे.