सांगली : सांगलीमधून एक मोठी बातमी समोर येते आहे. आज सकाळी नाशिकच्या दिशेने बेळगावकडे जात असणाऱ्या लष्कराच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे सांगलीतील एका शेतामध्ये या हेलिकॉप्टरचं लँडिंग करण्यात आल आहे. भारतीय लष्कराच हेलिकॉप्टर अचानक शेतामध्ये लँड झाल्यामुळे गावकऱ्यांनी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे.
नेमकं काय घडलं
भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर हे नाशिक कडून बेळगावच्या दिशेने जात होते. दरम्यान अचानक या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि कोणतीही आणीबाणीची परिस्थिती रोखण्यासाठी चालकांना हे विमान एका शेतामध्ये लँड केल आहे. सांगली जिल्ह्यातील एरंडोली या ठिकाणी एका शेतात या हेलिकॉप्टरचं लँडिंग करण्यात आलं. या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. परंतु अचानक अशा पद्धतीने लष्कराचे हेलिकॉप्टर शेतात लँड झाल्यामुळे गावकऱ्यांनी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे.
अति सामान्य नागरिकांसाठी खरंतर भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर अशा पद्धतीने शेतात लँड होणं हे अचंभित करणारे घटनाच आहे. त्यामुळे घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी हे हेलिकॉप्टर पाहण्यासाठी शेताकडे धाव घेतली. यातील काही अति उत्साही तरुणांनी व्हिडिओ आणि फोटो काढायला देखील सुरुवात केली होती. दरम्यान हा प्रकार रोखण्यासाठी भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांना या तरुणांना शांत करण्यासाठी अक्षरशः विनंती करावी लागल्याच देखील समजत आहे.