पुराणात या खेळाचा उल्लेख मल्लक्रीडा असा करण्यात आला आहे.तर हा खेळ फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात खेळला जातो.अशीच आपल्या मातीतली सर्वाधिक नावाजलेली कुस्ती स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी स्पर्धा पण तुम्हाला माहितीये का या स्पर्धेची सुरूवात नेमकी कधी झाली होती ती व कोणी केली होती?आणि पहिले महाराष्ट्र केसरी पैलवान कोण होते ?
१९५३ साली पुण्यातील कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना करून कुस्ती स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.यामागे त्यांचा एकमेव उद्देश होता तो म्हणजे कुस्ती हा खेळ टिकावा आणि इथल्या मातीतून चांगले मल्ल तयार होऊन ते देश विदेशात देखील चमकावे.म्हणून मग त्या वर्षाची पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात घेण्याचे आयोजन करण्यात आले होते,व या स्पर्धेत पुण्यातील नगरकर कुस्ती तालमीतले प्रसिद्ध पहिलवान तुकाराम नानासाहेब फाळके यांनी मुंबई गिरणी कामगारातील सर्वात मोठा मल्ल गोगाचाच सिद्धपा यांना अवघ्या दोन मिनीटात चीतपट करून मैदान मारले आणि पहिली ट्रॉफी जिंकली परंतु त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण झाले नव्हते त्यामुळे महाराष्ट्र केसरी म्हणावे का असा संभ्रम निर्माण झाला होता.त्यानंतर १९५५ साली ही स्पर्धा मुंबईत घेण्याचा निर्णय झाला परंतु काही कारणांनी ही स्पर्धा रद्द झाली.
त्यानंतरचे तीन वर्ष ही स्पर्धा झालीच नाही.मग त्यानंतर १९५९ साली सोलापूर येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली होते पण या स्पर्धेतही कोणालाच अंतिम सामन्यात पोहचता आले नाही,तर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजेच १९६० साली नागपूर येथे झालेली स्पर्धा अनिर्णित राहिली होती आणि त्याच वर्षी संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण झाले होती.तर त्यानंतर म्हणजेच १९६१ साली महाराष्ट्र केसरी स्पर्धा औरंगाबाद म्हणजेच आताच्या संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती आणि या वर्षी महाराष्ट्राला पहिला महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी मिळाला त्या पैलवानाचे नाव होते दिनकरराव दह्यारी जे कोल्हापूरच्या शाहूपुरी तालीमतले पैलवान होते.परंतु दह्यारी हे मूळ सांगली जिल्ह्यातील होते.तर १९६१ साली झालेल्या या स्पर्धेत जवळपास साडे पाचशे पैलवानांनी सहभाग नोंदवला होता.
तर ‘महाराष्ट्र केसरी’ या मानाच्या किताबासाठी खुल्या गटात नागपूरचे पैलवान राम अग्यारी,सांगलीचे बापू बेलदार व दिनकर दह्यारी आणि मुंबईतून बिरजू यादव व वसंत निगडे असे त्याकाळातील नामवंत मल्ल सहभागी झाले होते.परंतु अंतिम सामना रंगला तो दिनकर दह्यारी आणि बिरजू यादव यांच्यात आणि या सामन्यात दिनकर दह्यारी विजयी होत पहिले महाराष्ट्र केसरी ठरले तर बिरजू यादव पहिले उपमहाराष्ट्र केसरी ठरले होते.खरतर सुरुवातीला या स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख हे रक्कम स्वरूपात होते परंतु पुढे साल १९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले.आणि त्यानंतर साल २००८ पासून महाराष्ट्र केसरी विजेत्यांना चांदीची गदा आणि ५१ हजार रुपये रोख रक्कम मिळू लागली.तर सध्या महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा माती व गादी म्हणजेच मॅटवर होते.यामध्ये माती विभागातील विजेता पैलवान व मॅट विभागातील विजेता पैलवान यांच्यात महाराष्ट्र केसरी गदेसाठी अंतिम लढत होते जी आंतरराष्ट्री नियमांनुसार मॅटवर खेळली जाते आणि या अंतिम लढती मधील विजेता हा ‘महाराष्ट्र केसरी’ म्हणून घोषीत केला जाऊन त्यांना महाराष्ट्र केसरी ही मानाची गदा बहाल केली जाते.तर आतापर्यंत मुंबईच्या नरसिंग यादव या पैलवानांने २०११ ते २०१३ असे सलग तीन वर्ष महाराष्ट्र केसरी किताब मिळवला आहे तर २०१४ ते २०१६ चे महाराष्ट्र केसरी जळगावचे विजय चौधरी ठरले होते.