मुंबई : नवीन वर्षामध्ये सर्वात मोठा सोहळा 2024 मध्ये असणार आहे, तो म्हणजे अयोध्येतील श्री राम जन्मभूमी असलेल्या राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा… या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून प्रत्येक श्रीराम भक्त उत्सुकतेने वाट पाहतो आहे. आयोध्यामध्ये तर श्रीरामांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी होतेच आहे. असं असताना देशभरात देखील वेगवेगळे सोहळे आयोजित केले जात आहेत.
22 जानेवारीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशा आवाहनाच पत्र आज मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे. या पत्रामध्ये मंगल प्रभात लोढा यांनी लिहिले आहे की,
” 22 जानेवारी 2024 आयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराम प्रतिष्ठापना देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत होते आहे. प्रभू श्रीराम हे अवघ्या भारत देशाचे आराध्य आहेत . अयोध्या येथील मंदिर हे केवळ मंदिर नसून राष्ट्र मंदिर आहे. त्यामुळे 22 जानेवारी रोजी आयोध्या नगरीत राम लल्लांची प्राणप्रतिष्ठापना होताना महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी , ही सकल हिंदू समाजाची मागणी असून आपण जनतेच्या मागणीनुसार राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी तसेच सर्वत्र दीपोत्सव साजरा करण्याच्या सूचना देऊन सार्वजनिक दीपोत्सवासाठी परवानगी द्यावी ही नम्र विनंती असं या पत्रामध्ये म्हटलं आहे.
मुख्यमंत्री यावर सार्वजनिक सुट्टी जाहीर करतील की नाही हे अद्याप स्पष्ट नसलं तरी महाराष्ट्रात पुन्हा श्रीराम भक्त दीपोत्सव साजरा करतील यात शंका नाही.