मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणातील अंतर्गत वातावरण प्रचंड ढवळले गेले आहे. प्रमुख पक्ष्यांवर सध्या घटक पक्षांना किती जागा द्यायच्या ? आणि कोणाला द्यायच्या ? हा मोठा पेच प्रसंग उभा राहिला आहे. सध्या काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये असाच पेच सुरू आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी 23 जागांसाठी मागणी केली आहे. परंतु 23 जागा देण्यासाठी काँग्रेसने स्पष्ट नकार दिला आहे.
यावर संजय निरुपम यांनी आक्षेप घेतला असून ते काल माध्यमांशी बोलताना म्हणाले की, एवढ्या जागा जर शिवसेना उद्धव ठाकरे गट लढवणार असेल तर आम्ही काय करायचं ? इंडिया आघाडीमध्ये तुम्ही येत आहात मात्र जागांची मागणी करताना काळजी घ्या, असा सल्ला देखील संजय निरुपम यांनी दिला होता. यावर आज संजय राऊत यांनी संजय निरुपम कोण आहेत ? काँग्रेसचा हाय कमांड दिल्लीमध्ये आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, असा थेट टोला निरूपम यांना लगावला आहे.
आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, कोण किती जागा लढणार हे दिल्लीमध्ये ठरणार आहे. आम्ही जिंकलेल्या 18 जागांवर चर्चा करायची नाही, हे आधीच ठरलेलं आहे. जिथे काँग्रेसची ताकद तिथे काँग्रेस निवडणूक लढवेल. त्यांची मदत घेऊ. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्मुला दिल्लीमध्ये ठरणार आहे. उद्धव ठाकरेंची दिल्लीमध्ये वरिष्ठांशी चर्चा सुरु आहे. उद्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे. आमच्यात चर्चा सुरु आहे. मतभेद असण्याचं कारण नाही, असे संजय राऊत म्हणाले. जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही, असे आधीच ठरल्याचं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यामुळे शिवसेनेला 18 लोकसभेच्या जागा मिळणार.. हे जवळपास निश्चित आहे. शिवसेना त्याशिवाय आणखी पाच जागा वाढवून मागत आहे. ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे अथवा वचिंतसाठी त्या जागा असू शकतात, असा अंदाज वर्तवला जातोय.