अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील Sujay Vikhe यांच्याबाबत एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये सुजय विखे यांना गोळी घालण्याची धमकी देण्यात आल्याचं समजते आहे. यामुळे अहमदनगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय
नवी मुंबईतील कामोठे येथील सभेमध्ये ही ऑडिओ क्लिप सुजय विखे यांनी ऐकवली. या ऑडिओ क्लिपमध्ये दोन व्यक्ती फोनवर बोलत आहेत. ज्यातील एक व्यक्ती ही पारनेर तालुक्यातील कळस गावातील माजी उपसरपंच आहे. आणि दुसरी व्यक्ती ही निलेश लंके प्रतिष्ठान मीडिया सेलचा अध्यक्ष आहे. दरम्यान एका मुलाखतीमध्ये कळस गावातील माजी उपसरपंच यांनी सुजय विखे पाटील पुन्हा एकदा विजयी होतील असं वक्तव्य केलं होतं. यावरून माजी सरपंचांना थेट शिवीगाळ करण्यात आली. ही शिवीगाळ निलेश लंके प्रतिष्ठान मीडिया सेलचा अध्यक्ष याने केली असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर धमकी देखील देण्यात आली आहे.
उपसरपंचांनी दिलेल्या या मुलाखतीमुळे निलेश लंके सेलचे अध्यक्ष संतापले आणि त्यांनी उपसरपंचसह थेट विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना देखील गोळी घालू असं म्हटलं आहे. त्यामुळे नगरमध्ये सध्या वातावरण तापलेल आहे.
दरम्यान माध्यमांशी बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले कि, ” पारनेरच्या गोरगरीब जनतेने याआधी दहशतीत आयुष्य जगलं आहे. मात्र आता तुम्हाला दहशतीत जगू देणार नाही नगरच्या जनतेला दहशतीच्या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी मी पुन्हा लोकसभेत जात आहे. त्यांना किती गोळ्या घालायच्या तेवढ्या घाला. मात्र मी मागे हटणार नाही 4 जून 2024 ला समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणार हे स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या ! ” असा नाव न घेता निलेश लंके यांना टोला सुजय विखे यांनी लगावला आहे.