नांदेड : मराठा आरक्षण हा मुद्दा अद्याप देखील चिघळलेलाच आहे.अशातच आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे प्रमुख नेते जोरदार प्रचार करत आहेत. एकीकडे आज पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडते आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याची जबाबदारी स्वीकारलेले अशोक चव्हाण यांची गाडी नांदेडमध्ये अडवण्यात आली आहे. आज नांदेडमध्ये मराठा समाज अशोक चव्हाण यांच्याबाबत मोठा संताप व्यक्त करताना दिसून आला.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. सध्या अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी आपली संपूर्ण ताकद लावत आहेत. कशातच मुखेड तालुक्यातील जांब येथे गुरुवारी रात्री महायुतीची प्रचार सभा सुरू असताना सकल मराठा समाजाचे बांधव यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी आपण गप्प का असा सवाल करून मराठा समाजाने आपला संताप व्यक्त केला. तसेच त्यांची गाडी देखील अडवण्यात आली होती.
याबाबत स्वतः भाजप नेते अशोक चव्हाण यांनी ट्विट करून माहिती दिली. मराठा समाजाचे काही बांधव सभेत आले. त्यांचे निवेदन मी स्वीकारलं. सभा संपल्यावर आपण चर्चा करू अशी विनंती मी त्यांना केली. त्यानंतर आत्ताच निवेदन स्वीकारलं जावं अशी त्यांची मागणी असल्या कारणाने भाषण मध्येच थांबून मी त्यांचे निवेदन स्वीकारले असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.