मुंबई : मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच आंदोलन आता तीव्र होताना दिसून येते आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 3 मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. एकीकडे आंदोलनाची तीव्रता वाढवण्याच्या तयारीत जरांगे पाटील असताना त्यांच्या स्वतःच्या संकटात देखील वाढ होते आहे.
दोनच दिवसांपूर्वी त्यांचे जवळचे असलेले अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे पाटील यांच्यावर मोठे आरोप केले होते. त्यांना कोणाचा तरी फोन आला होता. त्यानंतरच ते लगेचच उपोषणास बसले. तो फोन नेमका कोणाचा होता ? असं आव्हान अजय महाराज बारस्कर यांनी दिलं होतं. यावर बारस्कर महाराज आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये बरीच शाब्दिक खडाजंगी झाली. 10 फेब्रुवारी रोजी उपोषण करण्यासाठी त्यांनी समाजाची मंजुरी घेतली नाही. माध्यमांशी बोलताना ते वेगळी भूमिका घेतात, असा आरोप अजय महाराज बारस्कर यांनी केला होता. तर आता संगीता वानखेडे यांनी देखील गंभीर आरोप केले आहेत.
संगीता वानखेडे या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून काम करत आहेत. संगीता वानखेडे यांनी देखील अजय महाराज बारस्कर यांच्यानंतर जरंगे पाटलांवर घणाघाती आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मनोज जरांगे यांची बाजू घेऊन मी छगन भुजबळ यांना ट्रोल केले. परंतु मला खरे समजल्यावर गेल्या १ ते १.५ महिन्यांपासून मी विरोध करत आहेत. मनोज जरांगे कोणाला विश्वासात घेत नव्हते. त्यांना शरद पवार यांचाही फोन येत होता. शरद पवार जसे सांगतात तसेच मनोज जरांगे करतात. असा थेट आरोप संगीता वानखेडे यांनी केला आहे.
या आरोप प्रत्यारोपांनंतर आता जरंगे पाटील यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.