मुंबई : टोल नाकाच्या मुद्द्यावरून आज राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला टोलनाके जाळून टाकण्याचा थेट इशारा दिला आहे . यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “गेल्या चार दिवसांपासून अविनाश जाधव आणि इतर सहकारी ठाण्यात ५ ठिकाणी झालेल्या टोलवाढीच्या विरोधात उपोषणाला बसले होते. मला राज्य सराकरकडून एक पत्र आलंय. त्यात सगळ्या गोष्टी नमूद केल्या होत्या. कुणाकुणाला टोल नाहीये, कुणाला टोल आहे असं त्यात लिहिलं होतं. टोलचा सगळा पैसा कॅशमध्ये आहे. हा पैसा जातो कुठे? याचं होतं काय? त्याच त्याच कंपन्यांना हे टोल मिळतात कसे? त्यानंतरही रस्त्यांवर खड्डे पडणार असतील तर हा पैसा जातो कुठे? आपण रोड टॅक्स भरतो, तो कुठे जातो? हे कुणालाही कळत नाही. अत्यंत घाणेरड्या परिस्थितीतले रस्ते आपल्या वाट्याला येतात”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
यावेळी राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोलमुक्त महाराष्ट्रसंदर्भात केलेल्या जुन्या विधानांच्या व्हिडीओ क्लिप्स पत्रकारांना ऐकवल्या. “सेना-भाजपा युती आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी होती. आत्ता काय आहे, त्याचं काय मातेरं झालंय हे कुणालाच माहिती नाही. तेव्हा हे पक्ष काय म्हणाले ते मी एकेक मिनिटाच्या क्लिपवरून दाखवतो”, असं म्हणत त्यांनी व्हिडीओ क्लिप्स ऐकवल्या. यात ही नेतेमंडळी आपलं सरकार आल्यानंतर किंवा अमुक तारखेपर्यंत महाराष्ट्र टोलमुक्त करण्यासंदर्भात दावे करत असल्याचं दिसत आहे.
“त्यांच्याकडे दर आठवड्याला, दर दिवसाला टोलचे पैसे जात असतात. हे सगळे एवढ्या थापा मारतात. त्यानंतर त्याच त्याच पक्षाला मतदान कसं होतं, हेच माझ्यासाठी अनाकलनीय आहे”, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.