मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये हालचालींना तुफान वेग आला आहे. आज महाविकास आघाडीची तीनही पक्षांच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की सर्व 48 जागा निवडून आणू..!
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, ” आम्ही प्रसन्न मुद्रेने बाहेर आलोय. आमची सविस्तर चर्चा झाली. काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड उपस्थित होते, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड तर शिवसेनेकडून मी (संजय राऊत) आणि विनायक राऊत, सीपीआय, सीपीएम देखील बैठकीली उपस्थित होते. लोकसभेच्या सर्व 48 जागांवर बैठक झाली आहे.”
तसेच ते म्हणाले कि, ” मविआ पुढेच पाहणार आहे. काही लोकांनी देव पाण्यात घातले होते. मात्र आम्ही 30 तारखेला पुन्हा बसू. आमची प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली आहे. आम्ही त्यांना अधिकृत आमंत्रण दिलेलं आहे. सर्वच प्रमुखांशी त्यांची चर्चा झाली आहे आणि दिल्लीतील नेत्यांशी देखील चर्चा झाली आहे. आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काम करु. त्यांची जी भूमिका तीच भूमिका आमचीदेखील आहे.”