नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा Mahua Moitra यांची खासदारकी रद्द करण्यात अली आहे. भाजपचे खासदार विनोदकुमार सोनकर यांनी हा अहवाल लोकसभेत मांडला. पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात संसदेच्या एथिक्स कमिटीने मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती. या अहवालावर प्रदीर्घ चर्चेनंतर महुआ मोइत्रा यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संसदेतून हकालपट्टी झाल्यानंतर महुआ मोइत्रा यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या कि, ” मी अदानी मुद्द्यावर भाष्य केल्यामुळे माझं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. एथिक्स कमिटीसमोर माझ्याविरुद्ध कोणताही मुद्दा नव्हता, कोणताही पुरावा नव्हता. त्यांचा एकच मुद्दा होता की मी अदानीचा मुद्दा उपस्थित केला होता. हकालपट्टी करण्याचा अधिकार नैतिकता समितीला नाही, ही तुमच्या (भाजप) अंताची सुरुवात आहे. असे त्या म्हणाल्या.
दरम्यान सदस्यत्व रद्द झाल्या नंतर त्यांनी लगेचच संसद भवनातून काढता पाय घेतला. महुआ मोइत्रा यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर विरोधी खासदारांनी सभागृहातून वॉकआऊट केले. दरम्यान, लोकसभेचे कामकाज 11 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महुआ मोइत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्याची घोषणा केली. खासदार म्हणून महुआ मोइत्रा यांचे वर्तन अनैतिक आणि अशोभनीय असल्याचा समितीचा निष्कर्ष हे सभागृह मान्य करते. त्यामुळे त्यांनी खासदारपदावर राहणे योग्य नाही. ‘लोकसभा अध्यक्षांनी महुआ मोइत्रा यांना समितीच्या बैठकीत संधी मिळाल्याचे सांगत नैतिकता समितीच्या शिफारशीनुसार सभागृहात बोलू दिले नाही. महुआ मोइत्रा यांना लोकसभेत बोलण्याची परवानगी द्यावी, अशी विरोधी खासदारांची मागणी आहे, सभापती ओम बिर्ला यांनी हे का केले जाऊ शकत नाही हे स्पष्ट केले.