वाराणसी : वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापीमधील सील केलेले वजुखाना वगळता संपूर्ण परिसराचे ASI सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, त्यावर आज सुनावणी होण्यापूर्वीच ASI ने सर्वेक्षण सुरू (Gyanvapi Case Gyanvapi Case) केले. हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यादव यांनी सांगितले की, ASI टीम ज्ञानवापी परिसरामधील वजुखाना वगळता संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करेल. मिळालेल्या माहितीनुसार, ASI ला ४ ऑगस्टपर्यंत जिल्हा न्यायालयात अहवाल सादर करायचा आहे.
ज्ञानवापी बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था (Gyanvapi Case Update)
वाराणसीमध्ये ज्ञानवापी परिसराचे परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण सकाळी ७ वाजता सुरू झाले. यादरम्यान ज्ञानवापी बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ज्ञानवापी संकुलाच्या पुरातत्व सर्वेक्षणासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) पथक रविवारी वाराणसीला पोहोचले. ASI पथकाने रात्री उशिरापर्यंत वाराणसीच्या आयुक्तांसोबत बैठक घेतली. याआधी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वाराणसी जिल्हा न्यायालयाने 16 मे रोजी ASI सर्वेक्षणाच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली होती. याआधी सर्वोच्च न्यायालयाने दावा केलेल्या ‘शिवलिंगा’च्या आजूबाजूच्या परिसराची सुरक्षा करण्याचे आदेश दिले होते.
स्थानिक न्यायालयात याचिका दाखल
वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांच्या न्यायालयाने २१ जुलै रोजी हिंदू बाजूची मागणी मान्य करत ज्ञानवापी मशिदीचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली. याआधी ऑगस्ट २०२१ मध्ये, मशिदीच्या आवारात असलेल्या माँ शृंगार गौरी स्थळावर नियमित उपासनेचा अधिकार मिळावा, अशी मागणी करत पाच महिलांनी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुस्लिमांच्या विरोधानंतर मे २०२२ मध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले. दरम्यान, हिंदू बाजूने मशिदीच्या आवारात स्नानासाठी असलेल्या तलावात ‘शिवलिंग’ सापडल्याचा दावा केला, तर मुस्लिम बाजूने त्याला कारंजे म्हटले.
हिंदू पक्षाचा दावा काय आहे?
हिंदू कार्यकर्ते असा दावा करत आहेत की, या ठिकाणी पूर्वी एक मंदिर अस्तित्वात होते. 17 व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेबच्या आदेशानुसार ते पाडण्यात आले होते. हिंदू पक्षाने न्यायालयाच्या आदेशाचे कौतुक केले. ज्ञानवापी संकुलाचे तीन घुमट, पश्चिमेकडील भिंत आणि संपूर्ण संकुलाची आधुनिक पद्धतीने तपासणी केल्यानंतर परिस्थिती स्पष्ट होईल, असे हिंदू बाजूच्या वकिलांनी सांगितले.
मुस्लिम पक्षाचा दावा काय आहे?
मशीद व्यवस्थापनाचे वकील मोहम्मद तौहीद खान यांनी सांगितलं की, ते वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणार आहेत. हे मान्य नसून याविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. या सर्वेक्षणामुळे मशिदीचे नुकसान होऊ शकते. मुस्लिम बाजूने त्याला कारंजे म्हटले.
आधुनिक तंत्रांचा वापर करून तपशीलवार वैज्ञानिक तपासणी
वजूखाना वगळता संपूर्ण ज्ञानवापी परिसराचे ASI सर्वेक्षण करण्याची मागणी हिंदू पक्षाकडून करण्यात आली होती. यावर जिल्हा न्यायाधीश डॉ.अजय कृष्ण विश्वेश न्यायालयाने हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर १४ जुलै रोजी निर्णय राखून ठेवला होता. यानंतर न्यायालयाने जिल्हा न्यायाधीशांना ज्ञानवापी मशिदीचा वजूखाना वगळता ASI कडून सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. आदेशात म्हटले आहे की, ASI च्या संचालकांनी जीपीआर (ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार) सर्वेक्षण, उत्खनन, डेटिंग पद्धत आणि सध्याच्या संरचनेच्या इतर आधुनिक तंत्रांचा वापर करून तपशीलवार वैज्ञानिक तपासणी करावी. जेणेकरून ते हिंदू मंदिराच्या पूर्वीच्या रचनेवर बांधले गेले आहे की नाही हे तपासता येईल.