अयोध्या : राम मंदिराच्या रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी विविध साइट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारची चुकीची माहिती फिरत असल्याचे आढळून आले आहे. याबाबत सरकार आता अॅक्शन मोडमध्ये आले आहे. सरकारने प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना राम मंदिर कार्यक्रमाशी संबंधित खोटे, चुकीचे मजकूर प्रकाशित न करण्याचा इशारा दिला आहे.
मंत्रालयाने दिला हा सल्ला
असा सल्ला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिला आहे. सोशल मीडियावर काही अप्रमाणित, प्रक्षोभक आणि दिशाभूल करणारे संदेश प्रसारित केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हे संदेश सांप्रदायिक सलोखा आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवू शकतात.
अयोध्येतील रामलल्लाच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना सोहळा २२ जानेवारी रोजी होणार असून, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वृत्तपत्रे, खाजगी सॅटेलाईट टीव्ही चॅनेल आणि डिजिटल माध्यमांमधील वृत्त प्रकाशकांनी खोटी किंवा फेरफार होण्याची शक्यता असलेला कोणताही मजकूर प्रकाशित आणि प्रसारित करणे टाळावे, असे यात म्हटले आहे.