यवतमाळ : तुळजापूर नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर महागाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या यवतमाळ येथील पथकाने गुरुवारी तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पकडला आहे. गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून या ट्रक मधून रेशनचे धान्य वाहतूक केले जात असल्याचे समजले होते. त्यावरून केलेल्या कारवाईमध्ये या ट्रकमधून रेशनचा 28 टन तांदूळ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नांदेड जिल्ह्यातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नांदेड येथून 28 तांदूळ भरलेला ट्रक राष्ट्रीय महामार्गाने यवतमाळच्या दिशेने नागपूरकडे जात असल्याचे समजले होते. आंबोडा येथील उड्डाण पुलाजवळ पोलीस पथकाने केलेल्या कारवाईमध्ये चालकाकडे कागदपत्रांची विचारणा केली असता, ट्रकचालक शेख मुजमीन शेख आलम याने उडवा उडवीची उत्तरे दिली. यावेळी ट्रकची पाहणी केली असता पांढऱ्या आणि खाकी रंगाच्या पोत्यांमध्ये तांदूळ असल्याचे आढळून आले.
अधिक चौकशी केली असता तिघा आरोपींनी मिळून सुमारे ११ लाख २० हजार रुपयांचे धान्य बाजारात विक्रीसाठी नेत असल्याचे कबूल केले. या तीनही आरोपींच्या विरोधात धान्याची अवैध वाहतूक केल्या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.